हिंडलगा कारागृहात शोधमोहीम, मोबाईल जप्त?
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी चौकशीसाठी नागपूर पोलिसांचे एक पथक गुरुवारी बेळगावात दाखल झाले आहे. या पथकातील अधिकाऱ्यांनी रात्री हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात धमकाविण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईसाठी सर्च ऑपरेशन राबविले आहे. धमकीसाठी वापरण्यात आलेला मोबाईल जप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. जयेश उर्फ जयेशकांत उर्फ शकीर या कैद्याची रात्री उशिरापर्यंत कसून तपासणी करण्यात येत होती. यासंबंधी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तपास यंत्रणांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कारागृह विभागाच्या सहकार्याने मोबाईलसाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले आहे.
14 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाला कॉल करून खंडणीसाठी धमकाविण्यात आले होते. त्याचवेळी कोल्हापूर व नागपूर पोलिसांनी कारागृहात शोधमोहीम राबविली होती. स्थानिक पोलिसांनीही अनेकवेळा तपासणी केली होती. दोन दिवसांपूर्वी खंडणीसाठी नागपूरला आणखी एक कॉल गेल्यामुळे पुन्हा तपास सुरू झाला आहे. पोलीस निरीक्षक दिगंबर व त्यांचे सहकारी बेळगाव येथे दाखल झाले असून गुरुवारी सायंकाळी 7 पासून नागपूर पोलिसांचे पथक हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात ठाण मांडून होते. जयेशला ज्या बराकीत ठेवण्यात आले आहे, त्या बराकीत शोधमोहीम राबविण्यात आली असून धमकावण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.
मंगळवार दि. 21 मार्च रोजी नागपूरला पुन्हा धमकीचा कॉल गेला आहे. आता 10 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळूर येथील एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू आहे.