बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून भिमाशंकर ते शिवनेरी या गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील लाखो शिवभक्त व धारकरी मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये बेळगाव, खानापूर, चिकोडी, निपाणी येथून हजारो धारकरी जिल्हा प्रमुख किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात मोहीम पूर्ण झाली. 28 जानेवारीच्या सायंकाळपासून सहावे ज्योतिर्लिंग श्री भिमाशंकर येथे धारकरी जमू लागले. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वा. आई तुळजा भवानीच्या आरतीने मोहिमेला प्रारंभ झाला. पहिला मुक्काम आहुपे येथे झाला. यावेळी पांडुरंग शास्त्री बलकवडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. तांबे येथे धारकऱ्यांसाठी भंडारा करण्यात आला. 4.5 टनाहून अधिक तांदूळ भंडाऱ्याला वापरण्यात आला.
शेवटचा मुक्काम शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर येथे झाला. मनोज खाडे यांनी धर्माविषयी मार्गदर्शन करून शेवटच्या दिवशी शिवप्रभू दौड घेण्यात आली. ज्या धारकऱ्याचा प्रथम क्रमांक येईल त्या धारकऱ्याला पुढील वर्षीच्या मोहिमेचा ध्वज मानकरी म्हणून गौरविले जाते. यावर्षी जयसिंगपूर येथील तेजस पवार याने शिवप्रभू दौडचा मान मिळविला. जुन्नर येथे नगर प्रदक्षिणा करून लाखोंच्या संख्येने धारकरी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन करत धर्मरक्षणाचे धडे दिले. यावेळी व्यासपीठावर सातारा येथील आमदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले, उद्योजक संजय मालपानी, आमदार महेश लांडगे, अंध व्यक्तींसाठी काम करणारे भाटिया व शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई उपस्थित होते.