वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या 2023 च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील इंग्लंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि न्यूझीलंडचे ख्रिस गॅफेनी यांची मैदानावरील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी आयसीसी तर्फे ही घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात हा अंतिम फेरीचा सामना खेळविला जाणार आहे.
या सामन्यासाठी आयसीसीने सामनाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा सोमवारी केली. सदर सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान खेळविला जाणार आहे. आयसीसीच्या कसोटी मानांकनात सध्या भारत पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसीची ही विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा दोन वर्षापूर्वी पहिल्यांदा आयोजित केली होती आणि भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. दरम्यान न्यूझीलंडकडून भारताला पराभव पत्करावा लागल्याने त्याना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारताने या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षीही अंतिम फेरी गाठली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम 5 दिवसांचा कसोटी सामना चुरशीचा होईल. या सामन्यासाठी 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. इंग्लंडचे अनुभवी पंच 59 वर्षीय रिचर्ड इलिंगवर्थ यांची ही 64 वी कसोटी आहे. तर न्यूझीलंडचे 48 वर्षीय ख्रिस गॅफेनी यांची ही 49 वी कसोटी आहे. आयसीसीच्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी इलिंगवर्थ यांनी मैदानावरील पंच म्हणून यशस्वी कामगिरी केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या या अंतिम कसोटीसाठी इंग्लंडचे पंच रिचर्ड किटलबॉरो यांची सलग दुसऱ्यांदा टीव्ही पंच म्हणून नियुक्ती केली आहे. लंकेचे कुमार धर्मसेना हे चौथे पंच म्हणून तर विंडिजचे रिची रिचर्डसन हे सामनाधिकारी म्हणून राहतील. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.