गांधी जयंतीनिमित्त सुटी न घेता कामावर हजर
बेळगाव : महात्मा गांधी जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांना सुटी होती. यामुळे सरकारी कार्यालये निर्मनुष्य झाली होती. असे असले तरी यंदा नगरविकास खात्याकडून अधिकाऱ्यांना कामावर हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर रचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी जातीने हजर राहून सेवा बजावत होते. या माध्यमातून नगर रचना विभागाकडून गांधीगिरी दाखविण्यात आली आहे. देशामध्ये 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात येते.
मात्र काही राज्यांमध्ये गांधी जयंती रोजी सरकारी कार्यालयांमध्ये अधिकवेळ काम करून त्यांना वंदन करण्यात येते. अशीच भूमिका नगरविकास खात्याने घेतली असून नगरविकास खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या अधिकाऱ्यांना कामावर हजर राहण्याची सूचना केली होती. नुकतेच नगरविकास मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना गांधी जयंती रोजीही काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार येथील नगरविकास विभागाचे योजना अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी 8 वाजल्यापासून कामावर हजर राहून अधिकवेळ काम करून गांधीजींना अभिवादन केले. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळाचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे, अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर गांधी जयंतीदिनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पूर्वतयारीचे नियोजन करण्यात आले.