बिबटय़ा अद्याप मोकाटच, शोधमोहीम सुरूच : गणेशोत्सवही धास्तीखालीच जाणार का?
प्रतिनिधी /बेळगाव
ड्रोन कॅमेरे, प्रशिक्षित श्वान, हत्ती, जेसीबी, आधुनिक तंत्र, हनीट्रप आणि शेकडो कर्मचाऱयांच्या माध्यमातून बिबटय़ासाठी राबविण्यात आलेली शोधमोहीम अद्याप अपयशी ठरली आहे. त्यामुळे शहरात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम तर दुसरीकडे बिबटय़ाची धास्ती, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 25 दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतरही बिबटय़ा हाती लागला नसल्याने गणेशोत्सवही बिबटय़ाच्या धास्तीखालीच जाणार का? अशी चिंता शहरवासियांना लागली आहे.
रेसकोर्स परिसरात आसरा घेतलेल्या चपळ बिबटय़ाने अनेकवेळा वनखात्याला चकवा दिला आहे. तर मागील सोमवारी बिबटय़ा वनखात्याच्या हातातून अलगद निसटला होता. दरम्यान परिसरातील विद्यार्थ्यांचेदेखील शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बिबटय़ा कधी सापडतोय? याच विवंचनेत पालक आणि विद्यार्थी आहेत. जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी बिबटय़ाने हल्ला करून रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. तेव्हापासून वनखाते बिबटय़ाच्या मागावर आहे. मात्र अद्याप बिबटय़ा मोकाटच आहे. सोमवारी क्लब रोडवर थरारक प्रसंगानंतर बिबटय़ाने सुटका करून घेतली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा मिलिटरी विनायक मंदिराजवळ बिबटय़ा नजरेला पडला होता. शनिवारी रेसकोर्स परिसरातील तलावात बिबटय़ा आल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती. मात्र हाताला काहीच लागले नाही. रविवारी तर एखादा पुरावादेखील हाती लागला नाही.
त्यामुळे बिबटय़ा आहे की, निघून गेला याबाबतही संभ्रम आहे.
वनखात्याचे कर्मचारी सर्व यंत्रणेनिशी रेसकोर्स परिसरात तळ ठोकून असले तरी बिबटय़ाने हुलकावणी दिली. बिबटय़ाच्या शोधासाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची घातला असला तरी अद्याप तो मोकाटच आहे. त्यामुळे हा सर्व निधी व्यर्थ गेला आहे. शहरात आलेल्या एका बिबटय़ाने शहरवासियांची झोप उडविण्याबरोबरच वनखात्यालादेखील हैराण केले आहे. आधुनिक कॅमेरे, हनीट्रप, पिंजरे व सर्व यंत्रणेचा वापर करूनदेखील बिबटय़ा हाती लागला नसल्याने आता कोणता उपाय राबवावा, या विवंचनेत वनखाते आहे.
रेसकोर्स परिसरातील दाट झाडी असलेला 250 एकरचा परिसर पिंजून काढला आहे. हत्तीवरून शार्पशूटरच्या माध्यमातून गुंगीचे इंजेक्शन देण्याचाही प्रयत्न झाला. शिवाय हनीट्रप आणि मुधोळ श्वानाच्या माध्यमातून शोधमोहीम राबविण्यात आली. तसेच कोंबिंग ऑपरेशन मोहीम सुरू आहे. मात्र बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे बिबटय़ा कोठे आहे? असा प्रश्न साऱयांनाच पडला आहे.
सारी यंत्रणा फेल
रेसकोर्स परिसरात दबलेल्या बिबटय़ासाठी वनखाते आणि पोलीस विभागाने सर्व यंत्रणा राबविली. मात्र अद्याप बिबटय़ा मोकाटच फिरताना दिसत आहे. त्यामुळे 25 दिवसांच्या कालावधीसाठी बिबटय़ाच्या शोधासाठी राबविलेली सारी यंत्रणा फेल ठरली आहे.
खासदार इराण्णा कडाडींची भेट
खासदार इराण्णा कडाडी यांनी सोमवारी रेसकोर्स परिसरात भेट देऊन पाहणी केली. शिवाय वनखात्याच्या अधिकाऱयांशी बिबटय़ाबाबत सविस्तर चर्चा केली. खासदार कडाडी यांनी रेसकोर्सच्या दाट झाडी असलेल्या परिसरात पायी चालत पाहणी केली. शिवाय वनखात्याच्या अधिकाऱयांना तातडीने बिबटय़ाला जेरबंद करा, अशा सूचना केल्या.
बिबटय़ाला लवकरच जेरबंद केले जाईल
बिबटय़ाच्या शोधासाठी कोम्बिंग ऑपरेशन मोहीम सुरू आहे. सर्व यंत्रणा बिबटय़ाच्या मागावर आहे. बाहेरून विशेष पथक मागविण्यात आले आहे. पावसामुळे बिबटय़ाच्या पाऊलखुणा मिळाल्या नव्हत्या. मात्र बिबटय़ाला लवकरच जेरबंद केले जाईल.
-मल्लिनाथ कुसनाळ (एसीएफ वनखाते)