सुधाकर काशीद,कोल्हापूर
Ganesh Utsav Kolhapur : लेसरच्या झगमगाटाशिवाय गणेशोत्सव साजरा होऊ शकतो,असे नव्हे तर, लेसरच्या झगमगाटातच यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार, हे कोल्हापुरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी मंगळवारी दाखवून दिले.गणेश आगमनाला इतके प्रखर झोत तर, विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीत लेसरचा झगमगाट किती असेल, याची झलकच उत्सव मंडळांनी आगमन मिरवणुकीत दाखवली.अर्थात गणेशोत्सवात लेसर लाईटचे झोत नकोत,असा आवाहनवजा इशारा देणाऱ्या पोलीस प्रशासनाची मंगळवारी लेसरच्या लखलखाटाकडे जणू ‘डोळे झाक’ झाली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेसरचा लखलखाट करायला कोणाची आडकाठी नाही, याची मंडळांना खात्रीच झाली.
मिरवणुकीलाच नव्हे तर प्रखर प्रकाशाचा कसलाही थेट डोळ्यावर पडणारा झोत डोळ्याला अतिशय धोकादायक असतो.अर्थात असा झोत डोळ्यावर येणार नाही, याची खबरदारी एरवी प्रत्येक जण आपापल्या परीने घेत असतो.पण मिरवणुकीत किंवा मोठ्या समारंभात असे एकसारखे,आडवे-तिडवे डोळ्यांवर पडणारे लेसरचे झोत रोखणे अतिशय कठीण असते.कारण मिरवणुकीत एकापाठोपाठ एक असे लेसरचे झोत गर्दीवर पाडले जातात.हे झोत जितके प्रखर तितकी मिरवणूक आकर्षक ही अनेक मंडळांची समजून पक्की झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून लेसरचे झोत हा मंडळाच्या आकर्षणाचा बिंदू ठरला आहे.
लेसरचे झोत सतत डोळ्यांवर पडल्याने त्याचा मिरवणुकीतील अनेकांच्या डोळ्याला होणारा त्रास,काही क्षणासाठी डोळ्यासमोर येणारे अंधारी,लेसरच्या प्रभावाखाली रात्र वाढेल तशी रंगत जाणारी मिरवणूक.त्यामुळे पोलीस प्रशासनाने यावर्षीच्या मिरवणुकीत लेसरचा वापर टाळावा,लेसर,साऊंड सिस्टीमशिवाय गणेशोत्सव साजरा करावा,असे इशारेवजा आवाहन केले होते. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात पारंपरिक उत्साहात व लेसरच्या झोताशिवाय नेत्रदीपक असेल,अशी कोल्हापूरकरांची बऱ्यापैकी समजूत झाली होती. पण प्रत्यक्ष गणेश मूर्तीच्या आगमनांना सुरुवात झाली आणि पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता मिरवणूक लेसरच्या रंगीबेरंगी झोतात अक्षरश: उजळून निघाली. झोताने आकाशही उजळून गेले.सोबत दोन टॉप,दोन बेस तडजोडीवर साऊंड सिस्टीमही दणाणत राहिली. शहरवासियांना वाटले आता लेसरचा हा लखलरवाट पोलीस कदाचित बंद करणार.पण तसे काही घडले नाही.लेसरचे रंगीबेरंगी प्रखर झोत केवळ मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी या मार्गावर नव्हे तर छोट्या-छोट्या रस्त्यावरही लखलखू लागले.अर्थात पोलिसांनी कोणावरही थेट कारवाई केली नाही.विसर्जन मिरवणुकीत हा लखलखाट किती टोकाचा असणार,याची झलक बहुतेक उत्सव मंडळानी दाखवून दिली.
प्रखर झोतात तुम्हीच जाऊ नका…
मिरवणुकीतलाच नव्हे तर प्रकाशाचा कोणताही प्रखर झोत थेट डोळ्यावर पडला तर तो डोळ्याच्या अर्तंभागात पडद्याला इजा करतो.काही जणांच्या पडद्याला सूज येते. नजर 24 ते 25 टक्क्यांनी कमी होते.काहीना त्याहून अधिक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.पोलीस जरूर यावर आवाहन करतात.पण तरीही मिरवणुकीत असे प्रकाश झोत सुरू राहिले तर आपणच त्याकडे थेट बघणे टाळणे.., एवढेच आपल्या आता हातात आहे.आपल्या डोळ्याची काळजी आपल्याला असेल तर या प्रखर झोताचा अनुभव घेणे टाळावे.
डॉ.आनंद ढवळे,नेत्ररोग उपचार तज्ञ