शिक्षकदिनी घटना : बेनचिनमर्डीतील खिलारी गँगच्या पाच जणांना अटक : जिल्ह्यात खळबळ
बेळगाव : गोकाक तालुक्यातील एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेनचिनमर्डी, ता. गोकाक येथील खिलारी गँगच्या म्होरक्याला गोकाक पोलिसांनी अटक केली असून एका खोलीत कोंडून त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांना यासंबंधीची माहिती दिली आहे. रमेश उद्दाप्पा खिलारी, रा. बेनचिनमर्डी असे खिलारी गँगच्या म्होरक्याचे नाव असून दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी ही घटना घडली आहे. आरोपींनी त्या महिलेला धमकावल्याने यासंबंधी उशिरा एफआयआर दाखल झाला आहे. 29 सप्टेंबर रोजी गोकाक शहर पोलीस स्थानकात भादंवि 341, 342, 384, 376(डी), 506, सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरोडे, अपहरण, चोरी, हनीट्रॅप आदी गुन्हेगारी कारवायांनी चर्चेत असलेल्या खिलारी गँगने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून
या टोळीतील बसवराज वसंत खिलारी हा फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खिलारी व एस. पी. सरकार गँगमध्ये वावरणाऱ्या या सर्व गुन्हेगारांवर प्रत्येकी 6 ते 9 गुन्हे नोंद आहेत. गोकाक तालुक्यात या टोळीने दहशत माजविली होती. वाहने व जनावरे चोरल्याच्या आरोपावरून दि. 18 सप्टेंबर रोजी गोकाक पोलिसांनी दुर्गाप्पा सोमलिंगाप्पा व•र, यल्लाप्पा सिद्धाप्पा गिसनिंगवगोळ, कृष्णा प्रकाश पुजेरी, रामसिद्ध गुरुसिद्धाप्पा तपशी या चौघा जणांना अटक केली होती. हे खिलारी गँगमधील गुन्हेगार असून सामूहिक अत्याचार प्रकरणात त्यांचाही सहभाग आहे. गँगचा म्होरक्या रमेशच्या अटकेनंतर आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाचवर पोहोचली असून आणखी एक आरोपी बसवराज हा फरारी झाला आहे. रमेश खिलारीला अटक करण्यासाठी गोकाक पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला होता. पोलिसांना चकवण्याच्या प्रयत्नात रविवारी मोटारसायकलवरून पडून तो जखमी झाला. त्याला गोकाक येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक डी. एम. मुल्ला, पोलीस निरीक्षक गोपाल राठोड, पोलीस उपनिरीक्षक किरण मोहिते, एच. डी. यरझरवी, एम. डी. घोरी, विठ्ठल नायक, बी. व्ही. नेर्ली, शिवानंद कस्तुरी, हालोळ्ळी, मंजुनाथ तळवार आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
चाकू, जांबियाचा धाक दाखवून लुबाडले
5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिना दिवशी गोकाक तालुक्यातील एक महिला गोकाकला आली होती. आपल्या परिचयातील व्यक्तीसोबत चहा पिण्यासाठी ती हॉटेलला जात होती. त्यावेळी सहा जणांपैकी एकाने महिलेसह दोघा जणांना दुसरीकडे नाष्टा करूया चला, असे सांगत एलईटी कॉलेज रोडवरील आदित्यनगर येथील एका खोलीत नेले. खोलीत दोघा जणांना कोंडून उर्वरित आरोपींना त्यांनी बोलावून घेतले. त्यानंतर चाकू व जांबियाचा धाक दाखवून महिलेजवळील दोन हजार रुपये, कर्णफुले, पर्स, मोबाईल काढून घेतले. तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या खिशातील दोन हजार रुपये, पर्स, एटीएम कार्ड, मोबाईल काढून घेतले. त्यानंतर महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. सायंकाळी त्या दोघा जणांना खोलीतून बाहेर सोडताना एकत्र उभे करून त्यांचा व्हिडिओ काढण्यात आला. पोलिसांकडे गेलात तर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल, असे धमकावण्यात आले. सुटकेसाठी 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्या महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली आहे.