पुणे / वार्ताहर :
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 81 किलो 755 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत 16 लाख 35 हजार रुपये आहे.
शशिकांत चांगदेव नलावडे (वय 29, रा. धनगरवाडी, सातारा) आणि प्रतीक युवराज ओहोळ (19, रा. सालसे, ता. करमाळा, सोलापूर) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीसी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नलावडे याच्यावर यापूर्वीही समर्थ पोलीस ठाण्यात एनडीपीसी ऍक्टनुसार गुन्हा दाखल आहे.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्त्यावर दोघे गांजा विक्रीस येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला. दोन जण संशयास्पद आढळून आली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये गांजा आढळून आला. 81 किलो 755 ग्रॅम गांजासह दोन मोबाईल, चार बॅग असा एकूण 16 लाख 59 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.