शास्त्रीनगर येथील प्रकाराने संताप
बेळगाव : डेनेज आणि गटारी साफ नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारींची दखल घेवून गटारीतील कचरा काढल्यानंतर तो रस्त्यावर तसाच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. शास्त्रीनगर येथे ड्रेनेज दुरुस्ती करून तो कचरा अनेकांच्या घरासमोरच टाकण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. याकडे महापालिका लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शास्त्रीनगर येथील ड्रेनेज तुंबल्यामुळे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेजची सफाई केली. याचबरोबर गटारीतील कचराही काढला. मात्र हा काढलेला कचरा अनेकांच्या घरासमोर तसाच ठेवला आहे. त्यामुळे ड्रेनेज तुंबलेला बरा म्हणण्याची वेळ या परिसरातील नागरिकांवर आली आहे. वास्तविक कचरा तातडीने भरून घेवून जाणे गरजेचे आहे. मात्र महापालिकेचे कर्मचारी केवळ कचरा काढून तसाच ठेवत आहेत.
कचऱ्यामुळे दुर्गंधी
शास्त्रीनगर परिसरामध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत. ड्रेनेज वारंवार तुंबत आहेत. याचबरोबर गटारीमध्ये कचरा व माती अडकून पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. आता तो कचरा काढण्यात आला. मात्र साठविलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. तेव्हा याकडे नगरसेवक, महापालिका लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.