वृत्तसंस्था/ ग्वाडालाजारा (मेक्सिको)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या ग्वाडालाजारा खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तृतीय मानांकित कॅरोलिन गार्सियाने बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्याचप्रमाणे अन्य एका सामन्यात सोफिया केनिनने कॅनडाच्या लैला फर्नांडिजचे आव्हान संपुष्टात आणत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. त्याचप्रमाणे कॅरोलिनी डुलहिडेने उपांत्य फेरी गाठताना इटलीच्या ट्रेविसेनचा पराभव केला.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या तृतीय मानांकित गार्सियाने अझारेंकाचे आव्हान 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे गार्सियाने आगामी होणाऱ्या डब्ल्युटीए टूरवरील 1000 दर्जाच्या फायनल्स स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या एका सामन्यात चौथ्या मानांकित सोफिया केनिनने कॅनडाच्या लैला फर्नांडिजचा 6-4, 6-7(6-8), 6-1 असा फडशा पाडत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. केनिनला हा सामना जिंकण्यासाठी जवळपास दोन तास झगडावे लागले. केनिन आणि अमेरिकेची बिगर मानोकित कॅरोलिन डुलेहिडे यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. अमेरिकेच्या बिगर मानांकित डुलेहिडेने इटलीच्या मार्टिना ट्रिवेसनवर 3-6, 7-6(9-7), 6-3 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. हा सामना 3 तास चालला होता.