मध्यप्रदेशात भाजपच्या निवडणूक वचनपत्रात विविध क्षेत्रांसंबंधीची आश्वासने
भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या वचनपत्राची घोषणा केली आहे. गॅसचा सिलिंडर अवघ्या 450 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्याचे वचन पक्षाने दिले आहे. तसेच वृद्धांना प्रतिमहिना 1,500 रुपयांचे निवृत्तीवेतन दिले जाणार असून गव्हासाठी 2 हजार 700 रुपये, तर भातासाठी 3,100 रुपयांचा किमान आधारभूत दर दिला जाणार आहे.
याशिवाय, लाडली बहना, या योजनेच्या अंतर्गत महिलांना घर दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंतचे शिक्षण विनामूल्य दिले जाणार असून इतरही अनेक महत्वाची आश्वासने देण्यात आलेली आहेत. हे वचनपत्र 96 पृष्ठांचे असून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांच्या हस्ते मध्यप्रदेशची राजघानी भोपाळ येथे शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले. ते चर्चेचा विषय बनले आहे.
अनेक आश्वासने
भाजपचे हे वचनपत्र ‘संकल्पपत्र’ म्हणून ओळखले जात आहे. त्यात वृद्धत्व निवृत्तीवेतनापासून कृषीक्षेत्रापर्यंत आणि शिक्षणापासून आरोग्यापर्यंत सर्व क्षेत्रांसाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशात आयआयटीच्या धर्तीवर मध्यप्रदेश आआयटी महाविद्यालयांची स्थापना करण्यात येईल, असेही आश्वासन आहे.
एकमेव विश्वासार्ह पक्ष
भारतीय जनता पक्ष हा देशातील एकमेव विश्वासार्ह पक्ष असून त्याने आजवर दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करुन दाखविले आहे. पक्षाच्या संकल्पपत्रात देण्यात आलेली सर्व आश्वासने पूर्ण करुन दाखविण्यात येतील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष न•ा यांनी केले. या संकल्पपत्राच्या प्रसिद्धी कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, राज्यभरातील भाजपचे महत्वाचे पदाधिकारी आणि मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकांना विश्वासात घेऊनच…
पक्षाने हे वचनपत्र लोकांना विश्वासात घेऊनच सज्ज केलेले आहे. यासाठी भाजपने विशेष समितीची स्थापना केली होती. समितीने सर्वसामान्य नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन हे वचनपत्र निर्माण केले. त्यातील आश्वासने वास्तव असून ती पूर्ण करण्याची क्षमता राज्य सरकारमध्ये आहे, असे प्रतिपादन भाजपच्या मध्यप्रदेश शाखेचे अध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनी केले.
भाजपची मुख्य आश्वासने
- स्वयंपाकाचा गॅस 450 रुपयांमध्ये उपलब्ध करणार
- वृद्ध लोकांना प्रतिमहिना
1,500 रुपये निवृत्तीवेतन
- गव्हासाठी 2,700 तर भातासाठी 3,100 किमान दर
- तेंदू पानांसाठी 4,000 रुपये प्रतिमानक दर देणार
- विंध्य एक्स्पे्रस आणि मध्यभारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करणार
- ग्वालियर आणि जबलपूर येथे मेट्रोचे निर्माणकार्य केले जाणार
- राज्याच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये स्थापन होणार वैद्यकीय महाविद्यायल
- लाडली बहना योजनेच्या लाभार्थींना दिली जाणार पक्की घरे
- गरीब परिवारांमधील विद्यार्थ्यांसाठी 12 पर्यंत शिक्षण विनामूल्य
- रीवा आणि सिंगरौली येथे
नवे विमानतळ स्थापन करणार
- गरीब कल्याण योजनेत धान्याबरोबरच तेल आणि डाळी देणार
- ग्रामीण भागातील महिलांना लखपती बनविण्याची नवी योजना
- राज्यातील वनवासींच्या कल्याणासाठी 3 लाख कोटी रुपये
- राज्यभरात स्थापन करणार
13 सांस्कृतिक केंद्रे आणि स्थाने