एलन मस्क पहिल्या स्थानावर ः अदानींची संपत्ती 12.34 लाख कोटी रुपये; अंबानी आठव्या क्रमांकावर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील अब्जाधीश गौतम अदानी हे 154.7 अब्ज डॉलर्स (सुमारे 12.34 लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत ‘टॉप-2’मध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकत हे स्थान मिळवले आहे.
फोर्ब्सच्या क्रमवारीमध्ये एलन मस्क यांच्यानंतर गौतम अदानी यांचा नंबर लागतो. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क 21.83 लाख कोटी (273.5 अब्ज डॉलर्स) संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. 12.27 लाख कोटी (153.8 अब्ज डॉलर्स) संपत्तीसह बर्नार्ड अरनॉल्ट तिसरे आणि जेफ बेझोस 11.95 लाख कोटी (149.7 अब्ज डॉलर्स) संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. बिल गेट्स 8.39 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह पाचव्या स्थानी असून मुकेश अंबानी जगात आठव्या स्थानी आहेत. आशियातील अदानी यांच्याव्यतिरिक्त रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे फोर्ब्सच्या टॉप-10 यादीत स्थान मिळवणारे दुसरे भारतीय आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती 7.35 लाख कोटी रुपये (92.1 अब्ज डॉलर्स) इतकी आहे.
17 दिवसांपूर्वी अदानी होते तिसऱया स्थानी
गौतम अदानी 17 दिवसांपूर्वी जगातील तिसऱया क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले होते. तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये त्यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना सर्वात श्रीमंत आशियाई म्हणून मागे टाकले होते. 2022 मध्ये अदानींनी आपल्या त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 78.2 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. हे कोणत्याही व्यावसायिकापेक्षा 5 पट जास्त आहे. अदानी 4 एप्रिल रोजी ‘सेंट बिलियनर्स’ क्लबमध्ये सामील झाले होते. 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या धनाढय़ांना ‘सेंट बिलियनर्स’ म्हणतात.
एप्रिल 2021 मध्ये अदानींची एकूण संपत्ती 57 अब्ज डॉलर्स होती. 2021-2022 या आर्थिक वर्षात त्यांची संपत्ती सर्वाधिक वेगाने वाढली. अदानी समूहाच्या नावे सध्या सात सार्वजनिक सूचीबद्ध कंपन्या आहेत. अदानी समूहाने आपली उपकंपनी विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडमार्फत (व्हीपीसीपीएल) ‘एनडीटीव्ही’ची प्रवर्तक कंपनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे 99.99 टक्के शेअर्स खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही कायदेशीर कारणांमुळे हा व्यवहार सध्या प्रलंबित आहे.
सिमेंट व्यवसायातही दमदार एन्ट्री
यापूर्वी मे महिन्यात गौतम अदानी यांच्या कंपनीने होल्सीमचा भारतीय सिमेंट व्यवसाय खरेदी करण्याची घोषणा केली होती. हा करार 10.5 अब्ज डॉलर्समध्ये झाला होता. या करारामुळे अदानी समूह भारतीय सिमेंट बाजारात दुसऱया क्रमांकावर पोहोचला होता.
बंदर व्यवसायात आघाडी
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी खासगी पोर्ट ऑपरेटर आणि एंड-टू-एंड लॉजिस्टिक प्रदाता आहे. दोन दशकांपेक्षा कमी कालावधीत त्याने संपूर्ण भारतातील बंदर पायाभूत सुविधा आणि सेवांचा पोर्टफोलिओ तयार केला आहे. त्यांची 13 सामरिकदृष्टय़ा सुसज्ज बंदरे आणि टर्मिनल देशाच्या बंदर क्षमतेच्या 24 टक्के प्रतिनिधित्व करतात.
श्रीमंत उद्योगपतींची क्रमवारी
(संपत्ती ः लाख कोटी रुपयात)
1. एलन मस्क 21.83
2. गौतम अदानी 12.34
3. बर्नार्ड अरनॉल्ट 12.27
4. जेफ बेझोस 11.95
5. बिल गेट्स 8.39
6. लैरी एलिसन 7.84
7. वॉरेन बफे 7.70
8. मुकेश अंबानी 7.35
9. लैरी पेज 7.10
10. सर्गी ब्रिन 6.81