वृत्तसंस्था/ सिडनी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य जिंकणाऱ्या भारताच्या त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. अश्विनी-तनिशा व एन.सिक्की रे•ाr-आरती सुनील यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
17 व्या मानांकित त्रीशा-गायत्री यांनी पहिल्या फेरीच्या लढतीत कॅनडाच्या कॅथरिन चोइ व जोसेफाईन वु या जागतिक 29 व्या मानांकित जोडीवर 21-16, 21-17 अशी मात केली. गायत्री-त्रीशा यांना एकाही स्पर्धेत दुसरी फेरी पार करता आलेली नाही. मात्र ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या फेरीत त्यांची लढत जपानच्या जागतिक चौथ्या मानांकित मायू मात्सुमोटो व वाकाना नागाहारा यांच्याशी होणार आहे.
चार वर्षांच्या खंडानंतर खेळणाऱ्या अश्विनी पोन्नप्पाने तनिशा क्रॅस्टोसमवेत खेळताना पहिल्या फेरीतच पराभूत झाली. या जोडीला इंडोनेशियाच्या फेब्रियाना द्विपुजी कुसुमा व अमेलिया काहाया प्रतिवी यांच्याकडून 11-21, 21-14, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला दुहेरीची आणखी एक भारतीय जोडी एन. सिक्की रे•ाr व आरती सारा सुनील यांनाही पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तैवानच्या हसु यिन हुइ व ली चिह चेन यांनी त्यांना 21-14, 21-17 असे हरवित आगेकूच केली. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप्सआधीची ही शेवटची स्पर्धा आहे.