वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन विकासदर (जीडीपी दर) अपेक्षेपेक्षा अधिक राहिल्यानंतर आता मे महिन्याच्या वस्तू-सेवा करसंकलनाचे (जीएसटी) वृत्तही अर्थव्यवस्थेसाठी आनंदवार्ता ठरले आहे. नुकत्याच संपलेल्या मे महिन्यात 1 लाख 57 हजार 90 कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. मे 2022 च्या तुलनेत हे संकलन 12 टक्के जास्त आहे. मे 2022 मध्ये ते 1,40,885 कोटी रुपये होते. मे महिन्यातील संकलनात केंद्रीय जीएसटीच्या माध्यमातून 28,411 कोटी रुपये, राज्य जीएसटीच्या माध्यमातून 53,800 कोटी रुपये आणि संयुक्त जीएसटीच्या माध्यमातून ऊर्वरित रक्कम मिळविण्यात आली आहे. सलग चौदाव्या महिन्यात जीएसटी संकलन 1.40 लाख कोटी रुपयांच्या वर झाले आहे. तर जीएसटी प्रणाली लागू झाल्यापासून पाच वेळा तो प्रतिमहिना 1.5 लाख कोटींच्या वर गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची वाढ 14 टक्के आहे.
महाराष्ट्र अव्वल
मे महिन्यातही जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा क्रमांक देशात प्रथम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात हे संकलन 16 टक्के अधिक झाले असून ते 23 हजार 536 कोटी रुपये आहे. कर्नाटकचा क्रमांक 10,317 कोटीसह दुसरा असून गुजरात 9,800 कोटीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वर्षभरात 22 टक्के वाढ
आर्थिक वर्ष 2022-2023 चा विचार करता या वर्षात एकंदर 18 लाख 10 हजार कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. याचाच अर्थ असा की, या आर्थिक वर्षाच्या प्रत्येक महिन्यात सरासरी 1.51 लाख कोटी रुपये जमा झाले. आर्थिक वर्ष 2021-2022 च्या तुलनेत ही वाढ 22 टक्के इतकी मोठी आहे.