आपल्या भाडेकऱ्याकडून भाड्याचे पैसे घेणे हा घरमालकाचा अधिकार आहे. तो अधिकार उपयोगात आणण्यासाठी ते उतावळे असतात. सहसा ते भाडेकऱ्याला यात कोणतीही सूट देत नाहीत. भाड्याची पै अन् पै, आणि तीही वेळेवर वसूल करण्यासाठी ते कठोर पावले उचलायला मागेपुढे पहात नाहीत. केवळ एवढेच नव्हे, तर आपला भाडेकरु हा सज्जन असावा अशी त्यांची अपेक्षा असते. त्याची ओळख पटविण्यासाठी ते त्याच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी ओळखपत्रांच्या प्रती मागून घेतात. काही घरमालक तर भाडेकरुकडे 10 वी आणि 12 वीच्या गुणपत्रिका दाखविण्याची मागणी करतात. काहींनी तर आपल्या भाडेकरुकडून, तो सुशिक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी, निबंध लिहून घेतल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. भाडेकरुलाही जागेची आवश्यकता असल्याने मालकांच्या असलेल्या विक्षिप्त मागण्याही त्याला पुऱ्या कराव्या लागतात.
तथापि, या कलियुगातही त्रेतायुगातील वाटावेत असे उदार अंत:करणाचे घरमालक आहेत. कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथे हे मालक आहेत. त्यांनी आपल्या भाडेकरुच्या स्टार्टअप कंपनीमध्ये 8 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. या भाग्यवान घरभाडेकरुचे नाव आहे पवन गुप्ता. त्यानेच ही माहिती सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. मालकाने स्वत:हून त्याच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. देशात नवनव्या उद्योगधंद्यांना आणि कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनी अशा उद्योजगांच्या व्यवसायांमध्ये ते गुंतवून त्यांच्या व्यवसायवाढीसाठी साहाय्य केले पाहिजे, असे या उदार आणि कनवाळू घरमालकाचे मत आहे. मालकाने केवळ गुप्ता यांच्या व्यवसायात पैसे गुंतवले आहेत असे नव्हे, तर त्यांना इतर साहाय्यही देण्याची इच्छा दर्शविली आहे. घरमालकाचा हा उदारपणा अनुभवलेले पवन गुप्ता यांनी सोशल मिडियावर या मालकावर स्तुतीसुमने उधळली आहेत. असा घरमालक मिळणे हे आपले महान भाग्य असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.