पेडणे बहुजन समाजाचे नेते उमेश तळवणेकर यांची मागणी
प्रतिनिधी /पेडणे
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताळगाव येथून मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तुये इलेक्ट्रॉनिक्स सिटी या दोन प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन केले होते. त्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत झाला आहे. मात्र तुये इलेक्ट्रॉनिक्स सिटी प्रकल्पाचे काम रखडले आहे. या प्रकल्पाकडे सरकारने लक्ष देऊन तो त्वरित पूर्ण करून बेरोजगारांना नोकरीची संधी द्यावी, अशी मागणी पेडणे बहुजन समाजाचे नेते उमेश तळवणेकर यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन करताज तो प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. परंतु तुये आयटी प्रकल्पाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे हा चांगला प्रकल्प रखडला आहे. बेरोजगारीची गंभीर समस्या असतानाही सरकार या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का करते, असा सवाल उमेश तळवणेकर यांनी केला.
लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सरकारचा एकही पैसा खर्च न करता साडे सहा लाख चौरस मीटर जमीन सरकारच्या ताब्यात दिली आणि तुये या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स सिटी हा बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यास प्रयत्न केले. या प्रकल्पाचे काम मागच्या सहा वर्षापासून रखडले आहे. परिसरात केवळ रस्त्यांचे जाळे विणले गेले असल्याचे तळवणेकर म्हणाले.
स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी दोन वेळा आयटी मंत्री रोहन खवटे आणि त्यानंतर आमदार तथा चेअरमन डॉ. चंद्रकांत शेट्यो यांना आणून प्रकल्प परिसराची पाहणी केली. मात्र पंचायतीला अंधारात ठेवून हे काम केले होते. आज पर्यंत या प्रकल्पाकडे त्यांनी का दुर्लक्ष केले ? असा सवाल तुयेचे पंच सदस्य उदय मांद्रेकर यांनी केला.