प्रतिनिधी/ बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी या महिला आणि मुलींसाठी कार्य करणाऱया संघटनेच्या 2022-23 सालच्या पदाधिकारी आणि संचालिकांचा अधिकारग्रहण सोहळा रविवार दि. 17 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रा चोपडे, सचिवपदी सुलक्षणा शिनोळकर, उपाध्यक्षपदी विद्या सरनोबत, अपर्णा पाटील तर खजिनदारपदी अर्चना पाटील यांची निवड झाली आहे. संचालिका म्हणून ज्योती पवार, शीतल नेसरीकर, सुवर्णा काळे, राजश्री हसबे, ज्योती सांगूकर, सुजाता देसुरकर यांची निवड झाली आहे. अध्यक्षा चंद्रा चोपडे या फुलबाग गल्लीतील राजमाता महिला मंडळाच्या अध्यक्षा असून सुरुवातीपासून अनेक वर्षे त्या सामाजिक कार्य करत आहेत.
उपाध्यक्षा विद्या सरनोबत यांनी कंग्राळ गल्लीतील एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. दुसऱया उपाध्यक्षा अपर्णा पाटील उगवत्या कवयित्री म्हणून नावारुपास येत आहेत. त्या बाग परिवारच्या सदस्या असून या माध्यमातून त्यांनी अनेक कवी संमेलनात सहभाग घेतला आहे.
सचिव सुलक्षणा शिनोळकर या पदवीधर असून त्या शिवाजी उद्यानातील सुहास्य क्लबच्या पदाधिकारी आहेत. त्या निसर्गप्रेमी असून त्यांच्या घरातील टेरेसवर शेकडो नमुन्यांची फुलझाडे त्यांनी लावली आहेत. खजिनदार अर्चना पाटील यासुद्धा बीकॉम पदवीधर असून त्याही सखीच्या सुरुवातीपासूनच्या सदस्या आहेत.
या अधिकारग्रहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स वेल्फेअर फौंडेशनचे विशेष समिती सदस्य मोहन कारेकर आणि फेडरेशनच्या अध्यक्षा तारादेवी वाली उपस्थित राहणार आहेत. विभागीय संचालक मदन बामणे यांच्या हस्ते अधिकार प्रदान करण्यात येणार असून प्रमुख वक्त्या म्हणून ऍड. सरिता पाटील उपस्थित राहणार आहेत.