वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे मानांकनात भारताचे स्टार फलंदाज शुभमन गिल व इशान किशन यांनी बढती मिळविली आहे. गिलने दोन स्थानांची प्रगती करीत पाचवे स्थान मिळविले आहे.
विंडीजविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारताने विजय मिळविला, त्यात इशान किशन व गिल यांची कामगिरी उठावदार झाली होती. तीन सामन्यात या दोघांनी मिळून 310 धावा जमविल्या. गिलने दोन स्थानांची बढती मिळवित पाचव्या स्थानावर मजल मारली तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम बराच पुढे आहे. गिलने या मालिकेतील कामगिरीने 743 रेटिंग गुण मिळविले. पाकचा फखर झमान (755) व इमाम उल हक (745) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत.
इशान किशननेही मोठी झेप घेत आजवरचे सर्वोत्तम वैयक्तिक मानांकन मिळविले असून 9 स्थानांची प्रगती करीत तो आता 36 व्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही दहा स्थानांची बढती मिळवित 71 वे स्थान घेतले आहे. वनडे अष्टपैलूंच्या मानांकनातही हार्दिकने 5 स्थानांची बढती मिळवित 11 व्या स्थानावर मजल मारली आहे.
वनडे गोलंदाजांत डावखुरा स्पिनर कुलदीप यादव व सीमर शार्दुल ठाकुर यांच्या मानांकनातही बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. कुलदीप टॉप टेनमध्ये दाखल झाला असून 622 रेटिंग गुणांसह तो गोलंदाजांच्या मानांकनात दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. विंडीजविरुद्ध त्याने 7 बळी मिळविले. शार्दुल ठाकुरने या मालिकेत सर्वाधिक 8 बळी मिळविले. त्याने तीन स्थानांची प्रगती करीत 30 वे स्थान मिळविले आहे. स्टार फलंदाज विराट कोहली फलंदाजांच्या मानांकनात नवव्या स्थानी कायम असून कर्णधार रोहित शर्मा 11 व्या स्थानावर आहे. नवोदित तिलक वर्माने फलंदाजांच्या मानांकनात प्रवेश केला असून त्याला 46 वे स्थान मिळाले आहे. कुलदीप यादवने सर्वात मोठी झेप घेतली असून त्याने 36 स्थानांची प्रगती करीत 51 वे स्थान घेतले आहे.