गोव्याच्या पोलीस खात्याची इज्जत घसरणीला लागलीय. वाढत्या कारनाम्यांमुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडू लागलाय. एका बाजूने गोव्याचे संतुलन बिघडत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उफाळून येत आहे. तर दुसऱ्या बाजूने ज्या पोलिसांना बिघडत्या परिस्थाला सामोरे जायचे आहे, तेच पोलीस गुन्ह्यांच्या फासात अडकत आहेत. पोलिसांची काळी यादीच आता तयार करावी लागेल. जे योग्य वळणावर येत नाहीत अशा डागाळलेल्या पोलिसांना घरीच पाठवावे लागेल. तीच सद्यस्थितीची गरज आहे. डागाळलेले पोलीस हे गोवा पोलीस दलातील विघ्न आहे. पर्यायाने सामाजिक विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठी गणरायाला साकडे घालणेच ईष्ट ठरेल.
एक काळ असाही होता की गोव्यातील युवक पोलीस दलात भरती होण्यास राजी होत नसत. त्यामुळे कारवार, बेळगाव, सिंधुदुर्ग, खानापूर, चंदगड, आजरा, गडहिंग्लज अशा प्रांतातील युवकांना संधी मिळत असे. अशा फळीतील पोलीस मागच्या वीस तीस वर्षांत निवृत्त होऊन गेले. काहींची मुले आता सेवेत आहेत. मागच्या तीस वर्षांत गोव्याच्या पोलीस दलात खूपच बदल झाले. गोव्याचा युवकही पोलिसांत भरती होऊ लागला. स्व. मनोहर पर्रीकरांनी पहिल्या पदार्पणात पोलीस दलाच्या आधिनुकीकरणासाठी अनेक पावले उचलली. कमी वेतनासाठी ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांना चांगले दिवस त्यांच्याच काळात आले. मागच्या पंधरा वर्षांच्या इतिहासात काही छोटे मोठे पोलीस कुठल्या कुठल्या थराला गेलेत हे जनतेने पाहिलेले आहे. अमली पदार्थांचा व्यवहार तर त्यांची कधीच पाठ सोडीत नाही. भ्रष्टाचाराच्या अनेक मार्गाचा अवलंब पोलीस करतात हे जगजाहीर आहे. त्यात भरीस भर म्हणून आता पोलिसांवर विनयभंग, लैंगिक अत्याचार, सेक्स स्कॅण्डल, चोरट्यांशी साटेलोटे, खुनाच्या प्रकरणांमधील सहभाग इत्यादी आरोप होऊ लागलेले आहेत. छोट्याशा गोव्यात अलिकडे पोलिसांच्या नावावर अनेक गुन्हे नोंद झालेले असून पोलिसांनाच पोलिसांवरच्या गुन्ह्यांचा तपास करावा लागत आहे. अनेकांवर खात्यांर्गंत पोलीस चौकशीही चालू आहे. पोलिसांचे निलंबन, बडतर्फी असे प्रकार सर्रास घडत आहे. सर्व काही करूनही नामानिराळे राहणारे असे बरेच पोलीस आणि त्यांचे अधिकारीही आहेत हा भाग वेगळा.
भ्रष्टाचाराची किड ही गोव्यातच नव्हे तर देशभरातील पोलीस दलात आहे हे सांगण्याची गरज नाही. गोव्याचे पोलीस खाते डागाळले असले तरी या खात्यात सर्वच पोलीस वाममार्गाला लागेलेले आहेत असाही अर्थ होत नाही. अगदी प्रामाणिकपणे सेवा बजावणारे निष्कलंक असे पोलीस खालपासून वरपर्यंत या दलात आहेत. मात्र, या साऱ्या बजबजपुरीत त्यांचा कोंडमारा झाल्याशिवाय राहणार नाही. या हतबल पोलिसांचे मनोधैर्य खचल्याशिवाय राहणार नाही. बरे वाईट लोक सर्वच क्षेत्रात असतात. त्याला पोलीस दल अपवाद ठरू शकत नसले तरी पोलीस हे कायद्याचे रक्षक असतात. लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात. हे सुध्दा तेवढेच खरे आहे. मात्र, या आदराला पोलीस पात्र ठरतात का हा वादाचा मुद्दा आहे. रस्त्यावरच्या एखाद्या साध्या अपघातातही चिरीमिरी शोधणारे पोलीस असतात. बाणस्तारीत मद्यपी कारचालकाने तिघांचे बळी घेतले. लोकांनी सतत काही दिवस उठाव केला नसता तर कोटी कोटी रूपयांचा वाटा कुणा कुणाला मिळाला असता याची कल्पना करता येते. पोलिसांचे प्रत्येक ठिकाणी असणारे सेटींग, त्यांचे कारनामे आणि जोडधंदे सर्वसामान्य जनतेला जेरीस आणणारे ठरले आहेत. अन्याय झाला तरी चालेल, परंतु पोलिसांची कटकट नको अशी स्थिती गरीबांची होते. गोव्यातील मंत्री आमदारही ऐवढे स्वस्त की साध्या पोलीस शिपायाचीसुध्दा त्यांच्याकडे दाट मैत्री असते. चुकलेल्या पोलिसांना दणका देण्याचा प्रयत्न वरीष्ठांकडून झालाच तर शिपायाचा धाक त्या अधिकाऱ्यालाही कळून चुकतो. पोलिसांची वैयक्तिक हप्तेबाजी असते आणि संघटित हप्तेबाजीसुध्दा असते. पोलिसांच्या हप्तेबाजीचा विषय नैतीक अधिकार गमावलेल्या नेत्यांनी काढू नये. रस्त्यावरचे अपघात म्हणा किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांची भांडणे, आपल्या माणसांना सांभाळून घेण्यासाठी मंत्री, आमदारांचे पोलिसांना फोन नित्याचेच. पोलिसांच्या प्रामाणिक कर्तव्यात अडचणीचे ठरणारे आणि पोलिसांनाच शिव्याशाप खायला लावणारे हेही एक कारण आहे. पोलीस केवळ शरीराने घडून चालणार नाही, मानसिकरीत्याही घडायला हवा. देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी घडणारे सुरक्षा दलांचे जवान आपल्या पोलिसांचे आदर्श ठरावे. त्यासाठी त्यांना त्या धर्तीचे प्रशिक्षणही मिळावे. तावूनसुलाखून निघावे आणि पोलीस सेवेत भरती व्हावे. अग्निपथ त्यासाठीची एक सुयोग्य व्यवस्था आहे. असा माणूस मानसिकरीत्या घडलेला असतो. आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असतो. ती भावना मनात नसल्यानेच गोव्याचा पोलीस मार्ग चुकत आहे. अशा पोलिसांची संख्या हळुहळु वाढू शकते. प्रत्येक पोलिसाच्या वर्तनावर बारीक नजर असायलाच हवी. पोलिसांची काळी यादी तयार व्हायलाच हवी. जे अमर्याद वागतात त्यांना घरी पाठवण्याची तयारी गृहखात्याने ठेवायलाच हवी. ज्यांना आपल्या नोकरीची किंमत कळत नाही, त्यांच्या जागी इच्छुक असलेल्या पात्र व्यक्तीची भरती व्हायलाच हवी.
बुधवारी पहाटेपर्यंत दीड दिवसाच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन झाले. पुढे अनंत चतुर्थीपर्यंत गणेश विसर्जन होत राहिल. या उत्सवात पोलीसही सेवा बजावतात. कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या घरच्या गणपतीकडे पाठ फिरवावी लागते याची त्यांना खंत पोलिसांना असतेच. पोलीस आणि गणेशोत्सवाचा जुना जिव्हाळा आहे. अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचा सर्वाधिक अधिकार हा पोलिसांचाच. पोलिसांची सोय व्हावी या उद्देशानेच गोव्यातील जवळजवळ सर्वच पोलीस स्थानकात गणेशोत्सव साजरा केला जातो. पोलीस आणि पोलिसांची कुटुंबेही या उत्सवात सहभागी होतात. श्री गणेश ही बुध्दीची देवता आणि विघ्नहर्ता गणली जाते. पोलिसांच्या इभ्रतीची घसरण हे सामाजिक विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्याचे साकडे गणरायाला घालणे ईष्ट ठरेल.
अनिलकुमार शिंदे