वृत्तसंस्था/ सिडनी
‘सामनावीर’ ग्लेन फिलिप्सचे दमदार शतक आणि ट्रेंट बोल्टच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर शनिवारी सिडनीच्या मैदानावर झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील गट 1 मधील सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे न्यूझीलंडने या गटात आपले आघाडीचे स्थान अधिक मजबूत केले आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 167 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेचा 19.2 षटकात 102 धावांत आटोपला.
या सामन्यामध्ये लंकेच्या गोलंदाजांनी सिडनीच्या खेळपट्टीचा सुरुवातीला चांगलाच फायदा घेतला. महेश तिक्ष्णा, धनंजय डिसिल्वा आणि रजिता या गोलंदाजांनी न्यूझीलंडचे पहिले तीन फलंदाज केवळ 15 धावांत बाद केले. डावातील पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा पहिला फलंदाज तंबूत परतला. तीक्ष्णाने पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर ऍलेनचा त्रिफळा उडवला. त्याने 1 धावा जमवली. त्यानंतर तिसऱया षटकातील दुसऱया चेंडूवर रजिताने कर्णधार विलियमसनला झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 8 धावा जमवल्या. चौथ्या षटकात धनंजय डिसिल्वाने सलामीच्या कॉन्वेचा एका धावेवर त्रिफळा उडवला. न्यूझीलंडची स्थिती यावेळी 4 षटकात 3 बाद 15 अशी केविलवाणी होती.
फिलिप्स आणि मिचेल यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गडय़ासाठी 84 धावांची भागीदारी केली. 9.4 षटकात न्यूझीलंडचे पहिले अर्धशतक फलकावर लागले. पहिल्या 6 षटकाअखेर न्यूझीलंडने 3 बाद 25 धावापर्यंत मजल मारली होती. डावातील 10 षटकाअखेर न्यूझीलंडने 3 बाद 54 धावा जमवल्या. फिलिप्स 30 तर मिचेल 11 धावावर खेळत होते. न्यूझीलंडच्या या जोडीने अर्धशतकी भागीदारी 43 चेंडूत झळकवली. या दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावावर अधिक भर देत धावफलक हलता ठेवला. डावातील 14 व्या षटकात न्यूझीलंडच्या या जोडीने करुणारत्नेच्या एका षटकात 18 धावा झोडपल्या. फिलिप्सने आपले अर्धशतक 39 चेंडूत पूर्ण केले. न्यूझीलंडची ही जोडी अखेर लंकेच्या हसरंगाने फोडली. हसरंगाच्या गोलंदाजीवर मिचेल त्रिफळाचित झाला. त्याने 24 चेंडूत 22 धावा जमवल्या. न्यूझीलंडने 14.3 षटकात 4 बाद 99 धावापर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडचे 14.4 षटकात फलकावर लागले. 15 व्या षटकाअखेर न्यूझीलंडने 4 बाद 102 धावापर्यंत मजल मारली. फिलिप्स 65 तर निश्चाम एका धावेवर खेळत होते.
शेवटच्या पाच षटकामध्ये न्यूझीलंडने 65 धावा घेतल्या. ग्लेन फिलिप्सने आपले दमदार शतक 61 चेंडूत झळकवले. फिलिप्सच्या खेळीमध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 10 चौकारांचा समावेश आहे. न्यूझीलंडचे दीडशतक 18.5 षटकात झळकले. लंकेच्या रजिताने निश्चामला 5 धावावर बाद केले. न्यूझीलंडचा निम्मा संघ 129 धावात बाद झाला होता. लंकेचा वेगवान गोलंदाज कुमाराने फिलिप्सला झेलबाद केले. त्याने 64 चेंडूत 104 धावा जमवल्या. न्यूझीलंडचा सोधी एका धावेवर धावचित झाला. सँटेनरने 5 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 11 तर साऊदीने 1 चौकारासह नाबाद 4 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावामध्ये 5 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे रजिताने 23 धावात 2 तर महेश तीक्ष्णा, धनंजय डिसिल्वा, हसरंगा आणि कुमारा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा 19.2 षटकात 102 धावात आटोपला. लंकेच्या डावामध्ये भानुका राजपक्षे आणि कर्णधार शनाका या दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. शनाकाने 32 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 35 तर राजपक्षेने 22 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 34 धावा जमविल्या. लंकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. पहिल्या षटकापासूनच त्यांच्या डावाला गळती लागली. त्यांच्या फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. न्यूझीलंडचा बोल्ट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. तो लंकेचा कर्दनकाळ ठरला. पॉवर प्ले अखेर लंकेची स्थिती 4 बाद 24 अशी होती. राजपक्षे बाद झाला त्यावेळी लंकेने 6 बाद 58 धावा जमवल्या होत्या. कर्णधार शनाकाला 17 व्या षटकात बोल्टने बाद केले. लंकेच्या डावात 3 षटकार आणि 10 चौकार नेंदवले गेले. न्यूझीलंडतर्फे बोल्टने 13 धावात 4 तर सँटेनरने 21 धावात 2, सोधीने 21-2, तसेच साऊदी आणि फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या विजयामुळे गट 1 मध्ये गुणतक्त्यात न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यातून 5 गुणासह पहिल्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 20 षटकात 7 बाद 167 (ग्लेन फिलिप्स 104, मिचेल 22, सँटेनर नाबाद 11, रजिता 2-23, तीक्ष्णा, धनंजय डिसिल्वा, हसरंगा आणि कुमारा प्रत्येकी एक बळी), लंका 19.2 षटकात सर्वबाद 102 (राजपक्षे 34, शनाका 35, रजिता नाबाद 8, बोल्ट 4-13, सोधी 2-21, सँटेनर 2-21, साऊदी 1-12, फर्ग्युसन 1-35).