सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ ः स्टेट बँकेचे समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजार कमकुवत असतानाही सोमवारी भारतीय शेअर बाजार मात्र सकारात्मक बंद होण्यात यशस्वी झाला आहे. महिंद्रा आणि महिंद्रा व स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक लाभात राहिले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 300 अंकांच्या वाढीसह 59,141 अंकांवर व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 91 अंकांनी वधारत 17,622 अंकांवर बंद झाला. सुरुवातीस नकारात्मक व्यवहार करणाऱया भारतीय शेअरबाजाराने काही तासानंतर तेजीकडे प्रवास सुरू ठेवला होता. एकावेळी निफ्टी निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 17,650 अंकांवर तर दुसरीकडे बीएसई सेन्सेक्सही 460 अंकांच्या तेजीसह 59,261 अंकांवर पोहोचला होता. फार्मा क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांचे निर्देशांक मात्र सकारात्मक होते. निफ्टीत सार्वजनिक बँकांचे समभाग 1 ते 2 टक्के इतकी तेजी राखून होते.
सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 148 अंकांच्या घसरणीसह 58,636 वर तर निफ्टी निर्देशांकही घसरणीसह 17,540 अंकांवर व्यवहार करत होता. यामध्ये बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा आणि महिंद्रा, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक व पॉवरग्रिड कॉर्पोरेशन यांचे समभाग तेजी दाखवत होते. अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, टायटन, टाटा स्टील, एचसीएल टेक, मारुती सुझुकी यांचे समभाग मात्र घसरणीत होते. याच आठवडय़ात 13 केंद्रीय बँकांची जागतिक स्तरावर बैठक होत असून त्यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्मयता आहे. याच दरम्यान अमेरिकेतील केंद्रीय बँकेचा व्याज दरवाढीचा निर्णय 21 सप्टेंबरला जाहीर होणार असून त्यात 0.75 टक्के वाढ जाहीर होणार, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
जागतिक बाजारात काहीशी घसरण अनुभवायला मिळाली. अमेरिकेत नॅसडॅक 100 अंकांनी घसरणीत होता. आशियाई, युरोपियन बाजारातही नकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.