रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध वर्ष सरलं तरी युद्ध काही संपताना दिसत नाही. या युद्धात युरोपियन युनियन आणि अमेरिका अप्रत्यक्षरित्या सहभागी झाल्याने रशियाने आपले कच्चे तेल, नैसर्गिक वायूचा युरोपियन देशांना होणारा पुरवठा रोखला. याने या देशांना एकप्रकारे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. यात सर्वात अधिक हानी झाली आहे ती जर्मनीची आणि जागतिक मंदीला याच देशांतून सुरुवात होणार असल्याचे भाकीत केले जात आहे. ते कितपत खरे ठरते, हे पाहण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे.
मागील दोन तिमाहीत जर्मनीची अर्थव्यवस्था नुकसानीच्या दिशेने सरकल्याने सदर देशात मंदीची झळ बसू लागल्याचे म्हटले जात आहे. जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला मंदीने घेरल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. युरोपियन युनियनमध्ये बलाढ्या मानल्या गेलेल्या जर्मनीत मंदीची चाहूल लागल्याने युरोप हादरलाआहे.
अर्थव्यवस्थेचा विकासदर सलग दोन तिमाहीसाठी शून्याखाली गेल्यास संबंधीत देशाला मंदीचे ग्रहण लागल्याचे मानले जाते. 2022 ची चौथी तिमाही आणि 2023 च्या पहिल्या तिमाहीत विकासदर शून्याखाली गेल्याने जर्मनीतील आर्थिक स्थितीची जाणीव संपूर्ण जगाला झाली. नवीन वर्षात ब्रिटनसहीत अनेक देशांत महागाईमुळे तेथील नागरिक हैराण झाल्याचे दिसून येत होते. जर्मनीतही सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसलेला आहे. त्याची प्रचिती आता युरोपला आलेली असून आता अनेक देश मंदीच्या कालचक्रात सामावले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. जर्मनीनंतर आता अमेरिकेतही मंदीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच जर्मनीपासून सुरु झालेली मंदी दीर्घकाळ चालणार असल्याचे म्हटले जाते.
कोविड महामारीनंतर जागतिक मंदीची शक्यता गेल्यावर्षीच वर्तविण्यात आली होती. कोविड महामारीच्या काळात मात्र जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. अनेक देश या मंदीत चांगलेच होरपळून निघाले होते. कोरोनाला रोखण्यासाठी जगभर लॉकडाऊनसारखे पर्याय अवलंबावे लागले. लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारचे उद्योग बंद होते. कोविड महामारीच्या काळातून सावरतो न सावरतो, तोच रशियाने युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर रशियाला एकाकी पाडण्याच्या व्युहरचनेला युरोपियन युनियन आणि अमेरिकेने चालना दिली. या सर्वांचा परिणाम म्हणून जागतिक मंदीचे वारे अधिक जोरात घोंगावू लागले. मात्र भारताची अर्थव्यवस्था अजून मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक मंदी ही दर दशक अथवा दोन दशकांच्या कालावधीत येत असते. यापूर्वी 1975, 1982, 1991, 2009 असा मंदीचा काळ राहिलेला आहे. मागील 2009 नंतरच्या जागतिक मंदीनंतर जागतिक स्तरावर बराच बदल झालेला आहे. यात कोविड महामारीने तीन महिन्यांसाठी संपूर्ण जगाला ठप्प करून सोडले होते. महामारीचा परिणाम साधारणत: दोन वर्षे राहिला. इकडे कोविडच्या कवेतून बाहेर पडत असतानाच जगाला प्रचंड महागाईने वेढलेले असून त्यातच रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध जुंपले असून ते संपताना दिसत नाही. या युद्धात युरोपियन युनियन आणि अमेरिका
अप्रत्यक्षरित्या सहभागी झाल्याने रशियाने आपले कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा युरोपियन देशांना होणारा पुरवठा रोखून धरल्याने या देशांना एकप्रकारे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. यात सर्वात अधिक हानी झाली आहे ती जर्मनीची आणि जागतिक मंदीला याच देशांतून सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ते कितपत खरे ठरतात, हे पाहण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे.
अमेरिका, चीन, जपाननंतर जर्मनी ही जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असून युरोपियन युनियनमधील बलाढ्या अर्थव्यवस्था आहे. मात्र जागतिक मंदीची सुरुवात याच बलाढ्या देशापासून सुरु होत असल्याने साहजिकच युरोपियन युनियनमधील एकेका देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युरोपातील हिवाळा ओसरल्यानंतर मंदीचे कडवे सत्य समोर आले. हिवाळ्यासाठी युरोपला मोठ्या प्रमाणात इंधन तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा गरजेचा असतो. मात्र यंदाच्या हिवाळ्यासाठी रशियाकडून थेट खरेदी आर्थिक निर्बंधांमुळे अशक्य असल्याने भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्पांतून रशियन इंधनाची खरेदी केल्याने खर्चात मोठी वाढ झाली. परिणामी महागाई शिगेला पोहोचली. जर्मनी रशियन इंधनाचा मोठा ग्राहक असल्याने सरत्या हिवाळ्यात सर्वाधिक फटका याच देशाला सहन करावा लागल्याने तेथील नागरिकांची एwपत खालावली. बाजारपेठेला उतरती कळा लागल्याने व्हायचे तेच झाले.
जगात आर्थिक मंदी येणार असल्याचे भाकित जगभरातील अर्थतज्ञांकडून होत असत. याचवेळी युरोपातील तज्ञ मंडळी ब्रिटन वगळता जागतिक मंदीत युरोपातील देश सापडण्याची शक्यता धूसर असल्याचे स्पष्ट करत होते. मात्र गेल्या सहा महिन्यांत जर्मनीच्या विकासदराची आकडेवारी पाहता हा देश आर्थिक मंदीच्या गर्तेत झोकला जात असल्याचे दिसून येत होते. जर्मनी हा युरोपातील आर्थिक महासत्ता असलेला देश असून या देशावर मंदीचे सावट आल्याने आता युरोपियन युनियनच्या आर्थिक सुबत्तेला धोका निर्माण झालेला आहे. जर्मनीला आर्थिक मंदीचा फटका बसल्यानंतर त्याचा सहज परिणाम युरोपियन युनियनला भोगावा लागणारआहे.
जर्मनीनंतर अमेरिका आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अमेरिकेवर असलेल्या कर्जाची चर्चा सध्या जगात जोरात सुरु आहे. तर ब्रिटनमध्ये सर्वसामान्यांना पोटाची खळगी भरताना नाकीनऊ येत असल्याच्या बातम्या गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहेत. ब्रिटनच्या नागरिकांनी बचतीला पर्याय म्हणून ऑनलाईन खरेदी, क्रेडिट कार्ड व अन्य ऑनलाईन रक्कम देणे बंद करून रोख रक्कमेचा वापर होऊ लागला आहे. जेणेकरून खिशातील रक्कम वाचवण्यास मदत होईल. कोविड महामारीनंतरचा जागतिक मंदीचा प्रवास जर्मनीच्या महाद्वारातून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशांत कामत