मुंबई / वृत्तसंस्था
मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, वाराणसी आणि राजस्थानमधील नाथद्वारानंतर रिलायन्स जिओ या दूरसंचार कंपनीने इतर दोन शहरांमध्ये आपली जीओ-ट्रू 5-जी सेवा सुरू केली आहे. या दोन शहरांमध्ये हैदराबाद आणि बेंगळूरचा समावेश आहे. कंपनीने 5-जी साठी ऑफर देखील सादर केली आहे ज्यात जीओ-वेलकम ऑफरचा समावेश आहे. यामध्ये कंपनी यूजर्सना अनलिमिटेड 5-जी डेटा देईल. यामध्ये 1 जीबीपीएसपेक्षा जास्त स्पीड देण्यात येत आहे.
रिलायन्स जिओ कंपनीने 6 शहरांमध्ये यशस्वी बीटा चाचणी केली आहे. आता जीओ-ट्रू 5-जी सेवा एकूण 8 शहरांतील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. या शहरातील सर्व 5-जी ग्राहकांना हाय-स्पीड अनुभवाचा लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत टेलिकॉम कंपनीकडून नवीन सेवेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे.
जीओ-ट्रू 5-जी सेवा हैदराबाद आणि बेंगळूरमध्ये सुरू करण्यात आली असून या सेवेचे आमंत्रण वापरकर्त्यांना पाठवले जात आहे. तथापि, हे अद्याप बीटा टप्प्यात आहे आणि यासाठी कोणत्याही वापरकर्त्यांस कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. येथील वापरकर्त्यांनी 239 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज केले असेल तरच त्यांना 5-जी सेवा दिली जाईल, असे सांगण्यात आले. एअरटेल लवकरच देशभरात 5-जी कव्हरेज प्रदान करेल. सध्या कंपनी 8 शहरांमध्ये आपली 5-जी सेवा देत आहे.