मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : नीती आयोगातर्फे कार्यशाळेचे आयोजन
पणजी : पंतप्रधानांनी दिलेले ‘विकसित भारत 2047’ चे लक्ष्य साकार करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला ही आनंददायक बाब आहे. त्याचबरोबर हे लक्ष्य गाठण्यासाठी आणि ‘विकसित गोवा 2047’ गाठण्यासाठी गोवा सरकारही प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. महिलांना उद्योजकता क्षेत्रात वाव देण्याच्या उद्देशाने नीती आयोगातर्फे आयोजित महिला प्रणित विकासावरील पहिल्या कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मंगळवारी दोनापावला येथे एनआयओ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास त्यांच्यासोबत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम, आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोव्यातील महिलांना होणार लाभ
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यात गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महिला बचत गट, महिला उद्योजकांना स्वयंपूर्ण करण्याचे उत्तम काम करत असल्याचे सांगितले. देशात आता पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार महिलाकेंद्रीत विकास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नक्कीच या कार्यशाळेचा गोव्यातील महिलांना लाभ होईल, असेही ते म्हणाले.
राज्यांनी पुढाकार घेण्याची गरज
सुब्रमण्यम यांनी महिला केंद्रीत विकास हे सरकारसमोर सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. याकामी राज्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास आयोग तयार आहे. पंतप्रधानांनी विकसित देशाचे लक्ष्य दिले आहे, यासाठी केंद्र सरकारसोबत राज्यांनी परिश्रम घेणे आवश्यक आहे. आर्थिक मदतीबरोबरच आयोगातर्फे योग्य सल्लागार, पायाभूत सुविधा आदींसाठीही आयोगाकडून मदत करण्यात येते. मार्चपर्यंत देशभरात किमान 50 कार्यशाळा आयोजित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. सारस्वत यांनी राज्यांच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आयोगाची भूमिका असल्याचे सांगितले. सध्या शिक्षणाच्या प्रमाणात रोजगार, महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन आणि कार्यक्षेत्रांची नव्याने रचना ही तीन प्रमुख कार्ये असल्याचे ते म्हणाले.
सामंजस्य करारावर सह्या
यावेळी आयोगातर्फे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) आणि मायक्रोसेव्ह कन्स्लटिंग यांच्यासोबत सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. त्यानंतर आयोजित चर्चासत्रात बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, पिरामल फाऊंडेशन यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यात प्रामुख्याने कॅबदोस्तच्या संस्थापक यमुना शास्त्राr, नारा आबाच्या संस्थापक टेग रिटा, मायना मुखर्जी, हिना उस्मान, दीक्षा निगम, मधुरिता गुप्ता, अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांचा समावेश होता.