पणजी : राज्यात दि. 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासात मान्सून सक्रिय राहिला. काणकोणमध्ये दीड इंच, मडगाव, केपेमध्ये एक इंच, पणजी व सांखळीमध्ये प्रत्येकी पाऊण इंच, म्हापसा, पेडणे, जुने गोवे व सांगे येथे प्रत्येकी अर्धा इंच पाऊस नोंदविला गेला आहे. यंदाच्या मोसमात राज्यात सरासरी 124 इंच पावसाची नोंद झालेली आहे. परतीच्या मार्गावर असलेला मान्सून सध्या बराच सक्रिय झालेला असून दि. 29 सप्टेंबरपर्यंत तो मुसळधार स्वरुपात पडणार असे भाकित हवामान खात्याने व्यक्त केले आहे. राज्यात येलो अर्लट जारी केला असून दि. 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात ताशी 75 कि. मी. या वेगाने वारे वाहण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. हवामान खात्याने हा परतीचा पाऊस म्हणून अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र आग्नेय दिशेने मोठ्या प्रमाणात पावसाळी ढग जमले आहेत. तामीळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार, पं. बंगाल आदी राज्यांमध्ये आता पावसाळा अधिक जोरदार सुरु होणार आहे. तोपर्यंत पश्चिम आणि मध्य भारतातील पाऊस परतीच्या मार्गाला लागेल, असा अंदाज आहे. मान्सूनचा अधिकृत मोसम 30 सप्टेंबर रोजी संपुष्टात येतो. त्यानंतर पडणारा पाऊस हा मान्सूनोत्तर पाऊस गणला जातो.
यंदाच्या मोसमात केपेत सर्वाधिक 140 इंच पाऊस
गोव्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस केपेमध्ये गणला गेला असून तिथे तब्बल 140 इंच पावसाची नोंद यंदाच्या मोसमात झालेली आहे. तसेच राज्यभरात आजपर्यंत सरासरी 124 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. वार्षिक सरासरी पेक्षा यंदा 4.8 इंच जादा पाऊस झालेला आहे. पावसाचा हंगाम सरकार दरबारी संपुष्टात येण्यास अद्याप पाच दिवस शिल्लक आहेत.