पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून करणार व्हर्च्युअल शुभारंभ : मडगाव येथील कार्यक्रमात रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
मडगाव : गेले कित्येक दिवस प्रतिक्षा लागून राहिलेल्या गोवा ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला अखेर मुहूर्त सापडला असून शनिवार दि. 3 जून रोजी सकाळी 10.30 वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारतचा शुभारंभ करतील. यावेळी मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्ण्व यांची उपस्थिती असेल. मुंबई ते गोवा मार्गावर वंदे भारत हायस्पीड टेनची यशस्वी चाचणी गेल्या काही दिवसामागे घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते गोवा व परत गोवा ते मुंबई या मार्गावर धावण्यास सज्ज झाली आहे. वंदे भारतचा शुभारंभ करण्यासाठी मडगाव कोकण रेल्वे स्थानकही सज्ज झाले आहे. मडगाव कोकण रेल्वे स्थानकावरील शुभारंभ कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर मंत्री, खासदार व आमदार इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दि. 3 जून रोजी शुभारंभानंतर वंदे भारत करमळी व थिवी या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. दि. 5 जूनपासून प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल झाल्यानंतर गोव्यातील मडगाव व थिवी हे दोनच थांबे घेणार आहे.
असा असेल मुंबई ते गोवा प्रवास
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही रेल्वे पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. पुढे ठाणे, पनवेल, खेड असा प्रवास करत रत्नागिरीला सकाळी 10 वाजता टेन येईल. दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी टेन गोव्यात मडगावला दाखल होईल.
गोवा ते मुंबई प्रवास
मडगाव येथून टेन दुपारी 2 वा. 35 मिनिटांनी सुटेल. पुढे रत्नागिरी, खेड इथून 6 वाजून 48 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही रेल्वे रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.
कणकवली येथे थांबा
वंदे भारत हायस्पीड टेनला सिंधुदुर्ग जिह्यात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबईहून मडगावला येताना कणकवली येथे 11.20 वा टेन पोहोचेल. तर, मडगाववरून मुंबइकडे जाताना 4.10 वाजता टेन कणकवलीत थांबेल.