प्रतिनिधी/ पणजी
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भारत सरकारच्या उपक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी गोवा राज्यनिर्मिती दिवस मुंबई राजभवनच्या दरबार सभागृहात साजरा केला.
भारतातील वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीची देवाण-घेवाण करून आपसात एकात्मता वाढावी हा उद्देश धरूनच हा दिवस साजरा करण्यात आला.
आपल्या संभाषणात श्री. रमेश बैस यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य, परंपरा, सांस्कृतिक परंपरा तसेच भाषा व वेगवेगळ्या पारंपरिक प्रथा यांच्या संमन्नतेने नटलेल्या सुंदर प्रदेशाला शुभेच्छा देण्यास मला खूप आनंद होत आहे, असे उद्गार त्यांनी काढले. भारतीयत्व हे तत्व आम्हाला एकजूट ठेवते. वेगवेगळ्या प्रदेशाचा राज्य निर्माण दिवस साजरा करणे म्हणजेच आपल्या देशातच समृद्धतेने नटलेल्या विविध संस्कृतींचे ज्ञान आत्मसात करणे होय, असेही ते म्हणाले. ज्या प्रदेशाने आम्हाला लता मंगेशकर, आशा भोसले, डॉ. रघुनाथ माशेलकर, रेमो फर्नांडिस व मनोहर पर्रीकर यांच्यासारखी अनमोल रत्ने दिली त्याच प्रदेशाचा हा दिवस साजरा करताना मला अत्यंत आनंद होतो, असे ते म्हणाले.
माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत स्थायिक झालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेल्या व्यक्तींचे या वेळेस सत्कारही करण्यात आले. यामध्ये समाज कार्यकर्त्या डॉ. अर्मिडा फर्नांडिस, गायक अजीत कडकडे, गायिका देवकी पंडित, पार्श्वगायक सुदेश भोसले, फिलेत्रोपीस्त (मदतगार) सुमन रमेश तुलसीयानी, उद्योजक अशांक देसाई, आचारी शॅफ दिपा सुहास अवचट व आमी गोंयकार संस्थेचे अध्यक्ष मोहन संझगिरी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंबईच्या आमी गोंयकार या सांस्कृतिक व कला क्षेत्रात वावरणाऱ्या संस्थेने गोमंतकीय संस्कृती दर्शन होणारा अत्यंत सुंदर कार्यक्रम सादर केला. ज्यामध्ये गोमंतकीय लोकसंगीत, घुमटवादन, लोकनृत्य, कांतारां, कविता व गोमंतदर्शन सादर होणारा एक माहितीपटही दाखवण्यात आला.
रसिकांनी या कार्यक्रमाला प्रचंड टाळ्यांनी उत्तम दाद दिली. या कार्यक्रमात गोमंतकीय गायिका शकुंतला भरणे यांनी कोकणी गीते सादर केली. वैशाली वर्तक यांनी बा. भ. बोरकरांची गाणी सादर केली व डॉ. घन:श्याम बोरकर यांनी बा. भ. बोरकर यांच्या काही कविता सादर केल्या. ज्योती कुराडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन केले. शेलार ग्रुप यांनी अतिशय सुंदर घुमटवादन सादर केले. मायराईड ग्रुप यांनी पारंपरिक दीपनृत्य सादर केले. विकास केरकर यांनी तयार केलेला माहितीपट दाखवण्यात आला. आमी गोंयकार संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष डॉ. अस्मिता हेगडे, अॅङ उषा आमोणकर यांनी सर्वांचे स्वागत केले. आमी गोंयकार संस्थेचे समर्पित सदस्य संतोष प्रभू गावकर, सागर सावर्डेकर, विक्रम जोशी व अन्य सदस्य यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगिरी बजावली. राज्यपालांच्या कार्यालयातून त्यांची प्रशंसाही करण्यात आली.
मागील वर्षीच स्वर्गवासी झालेले संजय हेगडे यांच्या नेतृत्वाने आमी गोंयकार ही संस्था मागची पंधरा-वीस वर्षे मुंबईत, गोमंतकीय कला व संस्कृती जतन करण्यासाठी कार्यरत आहे.