21 जूनपासून प्रारंभ : जागतिक पर्यटन आव्हाने आणि संधींवर होणार चर्चा
पणजी : जी 20 बैठकांच्या मालिकेतील गोव्यातील चौथी परिषद येत्या 21 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. ’जागतिक पर्यटन आव्हाने आणि संधींवर चर्चा व निराकरण करणे’ या उद्देशाने ही बैठक होत आहे. पर्यटन कृतीगट आणि मंत्री पातळीवर होणाऱ्या या दोन दिवशीय बैठकीत पर्यटन व्यवसायाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार असून गोव्यात आयोजित होणाऱ्या जी 20 कार्यक्रमांच्या अनुषंगाने तो साजरा होईल. यावेळी पर्यटनासाठी गोवा रोडमॅप आणि कृती आराखडा घोषित करण्यात येणार आहे.
प्रतिनिधींसाठी योग सत्रे
या परिषदेत सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींसाठी आयोजित विविध सांस्कृतिक कार्यांबरोबरच ’गोव्यातील योग’ देखील अनुभवता येणार आहे. जी 20 मंत्रीगट बांबोळी येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये योग सत्रात भाग घेतील, तर उर्वरित प्रतिनिधी दोनापावला किनाऱ्यावर योग प्रात्यक्षिके करतील. केंद्रीय पर्यटन सचिव म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारलेल्या व्ही. विद्यावती यांनी गोव्यातील जी20 कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीच्या तयारीबाबत विचारले असता आपण मुख्य सचिवांची भेट घेतली, तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांमधील लोकांशी सविस्तर चर्चा केली आणि बैठकीच्या तयारीबद्दल गोवा सरकारने मुख्यमंत्र्यांना केलेल्या सादरीकरणातही सहभाग घेतला, असे त्यांनी सांगितले.