वाहतूक अन्य मार्गाने वळविणार : रहदारीसाठी ठरणार डोकेदुखी, सहकार्याचे आवाहन
बेळगाव : तिसऱ्या रेल्वेगेटपासून गोवावेस-बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या अटल बिहारी वाजपेयी मार्गावर व्हाईट टॅपिंगची कामे सुरू आहेत. तसेच एलअँडटी कंपनीने 24×7 पाणीपुरवठ्याची कामेही हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर तब्बल महिनाभरासाठी या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी बुधवारी रात्री एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून ही कामे पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात येणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांचा बेळगाव दौरा ठरला आहे. त्यामुळे तो दिवस या आदेशातून वगळण्यात आला आहे. तिसऱ्या रेल्वेगेटपासून येणारी वाहने गोगटे सर्कलकडे वळविण्यात येणार आहेत. चन्नम्मा सर्कलहून येणारी वाहने गोगटे सर्कलहून काँग्रेस रोडकडे वळविली आहेत. अनगोळ, वडगाव, शहापूरकडे खानापूरहून येणारी वाहने देसूर क्रॉसजवळ वळवून येळ्ळूरमार्गे सोडण्यात येणार व चोर्ला, जांबोटी, पिरनवाडीहून येणारी वाहने बेम्को क्रॉसजवळ उजव्या बाजूने वळवून केएलई इंजिनिअरिंग मार्गे चौथ्या रेल्वेगेटहून अनगोळ मुख्य रस्त्याकडे वळविण्यात येणार आहेत. टिळकवाडी येथील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठहून बेळगाव शहरात येणाऱ्या वाहनधारकांनी गोवावेसकडे न जाता दुसऱ्या रेल्वेगेटमार्गे देशमुख रोड, शुक्रवार पेठ, पहिले रेल्वेगेटवरून काँग्रेस रोडवरून जावे. अनगोळ, भाग्यनगर, आदर्शनगर, हिंदवाडीवरून गोवावेसकडे येणारी वाहने डाक बंगल्याजवळ (कोरे गल्ली क्रॉस) वळविण्यात येणार असून ही वाहतूक शहापूरमार्गे गोवावेसकडे वळविली आहे. नागरिकांनी पोलिसांशी सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.