अध्याय एकोणतिसावा
उद्धव भगवंतांना म्हणाला, देवा भक्तांच्यावर तुमचे थोर उपकार आहेत. तुमच्या भक्तांचे पाप हे कृपाळा तुम्ही अंतरबाह्य निर्दाळून टाकता. भक्तांच्या अंतरात वास करून तसेच बाह्य रुपात सद्गुरू होऊन तुम्ही हे कार्य करता. दोन्ही रुपात करुणाकर होऊन तुम्ही भक्तांच्या डोक्यावरचा पापाचा भार उतरवता. अशा तऱ्हेने भक्तांना भवसमुद्राच्या पार करून देऊन निर्धाराने पुढे घेऊन जाता. ह्या तुमच्या निर्धारामुळे भक्तांचे मी तू पण सहज नाहीसे होते.
तसेच त्यांचा देहाभिमानही नष्ट होतो. असे झाले की त्यांचे जन्म, म्हातारपण आणि मरण संपून जाते. त्यामुळे ते आनंदघन होतात. मनुष्याची आयुष्यभर कायम टिकणारा आनंद मिळवण्यासठी धडपड चालू असते. म्हणून म्हणतो, भक्तांवर तुम्ही कोटी कोटी उपकार करता आणि तुमची स्वरूपस्थिती भक्तांना प्राप्त करून देता. ह्यामुळेच तुम्ही तिन्ही लोकात वंद्य झालेले आहात. तुमचा नीजप्रसाद मिळाल्याने भक्तांना कोणत्याही कारणाशिवाय प्राप्त होणारा आनंद सदैव मिळू लागून ते सुखी होतात. एखाद्या कारणामुळे होणारा आनंद हा तात्पुरता असतो कारण नाहीसे झाले किंवा आनंद देणारा प्रसंग जुना होत गेला की त्यातले नाविन्य संपते आणि त्यातून मिळणारा आनंदही ओसरू लागतो. परंतु तुमच्या निजप्रसादातून मिळणाऱ्या आनंदाची गोष्टच निराळी असते. त्याला ओहोटी कधीच लागत नाही. तेव्हा असा कधीही न संपणाऱ्या आनंदाचा अनुभव घेत तुमचे भक्त उरलेले प्रारब्ध संपेपर्यंत जीव स्वानंदबोधात घालवतात. ते देही असून विदेही अवस्थेत जगतात. त्यामुळे त्यांना ते करत असलेल्या कर्मातून कोणत्याही फळाची अपेक्षा नसते. त्यामुळे ते कर्म करून अकर्ते असतात. त्यांना अशी अवस्था तुमच्या कृपेनेच प्राप्त होते असे अगणीत उपकार तुम्ही भक्तांवर करत असता. तुमच्या उपकारांची परतफेड करणे भक्ताला शक्यच नसते. हे झाले साधकांच्या बाबतीत परंतु कोणतीही साधना न करणाऱ्यांवरही भगवंत अनेक उपकार रोज करत असतात. त्याबद्दल बोलताना उद्धव म्हणाला, तुमच्यामुळे माणसाच्या मनाला मनपण येते. त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो. इंद्रियांना स्फुरण येते. त्याच्या देहाचे क्षणाक्षणांचे व्यापार तुमच्यामुळे चालतात असे नित्य नवे उपकार तुम्ही त्याच्यावर करत असता. त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला तुमच्या उपकारांची परतफेड करणे शक्यच नसते. त्याने जी जी साधने करावीत ती ती तुमच्या कृपेने सुफल संपूर्ण होतात.
अशाप्रकारचे अनेक उपकार करून कित्येक थोर थोर मंडळींचा तुम्ही उद्धार केलेला आहे. साध्या भोळ्या लोकांना योगाभ्यास, तप, व्रतवैकल्य इत्यादि कष्टसाध्य गोष्टी जमण्यासारख्या नसतात अशा लोकांचाही उद्धार व्हावा ह्यादृष्टीने, आता माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्यांना सहज आचरणात आणता येईल असा काही उपाय सांगा. असे म्हणून उद्धवाने देवांच्या पायावर डोके ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला, देवा, मी तुम्हाला आत्ताच ही विनंती करण्याचे कारण म्हणजे तुम्ही आता लवकरच निजधामाला जाण्याचा मनोदय बोलून दाखवला आहात. तुम्ही निजधामाला गेल्यावर दीन जनांचा उद्धार व्हावा म्हणून सहज समजून अमलात येण्याजोगा उपाय आम्हाला कोण सांगणार? तुमच्या एव्हढा दिन जनांचा कैवारी मला तरी कोण आढळत नाही. दिन जनांचा उद्धार व्हावा म्हणून उद्धवाने केलेली कळकळीची विनंती ऐकून कृपामूर्ती भगवंत तुष्ट झाले.
सर्वसामान्य लोकांचा उद्धार व्हावा ही उद्धवाच्या मनातली इच्छा जाणून त्यांना खूप आनंद झाला. उद्धवावर प्रसन्न होऊन संसार तरुन जाण्यासाठी ब्रह्मप्राप्ती होण्याचा सहज सोपा उपाय आता अत्यंत सुंदर मुखकमल असणारे भगवंत सुहास्यवदनाने सांगणार आहेत. भगवंत मेघगर्जनेप्रमाणे गडगडाटी आवाजात बोलू लागले. ते म्हणाले, उद्धवा तू धन्य आहेस. तुझा प्रश्न ऐकून मला अत्यंत समाधान वाटले.
क्रमश: