पूर्वीची प्रकरणे गंभीरपणे न घेतल्याने परीक्षा रद्दची नामुष्की, सरकारची नाचक्की : बेळगावमधील प्रकरणांचाही तपास होणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या कर्नाटकात 545 पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने ही परीक्षाच रद्द केली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱया सीआयडीकडे बेळगाव जिल्हय़ातील आठहून अधिक अशाच प्रकरणांचा तपास सोपविण्यात आला आहे. गेल्या एक वर्षापासून सीआयडी या प्रकरणांचा पिच्छा पुरवत आहे. पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची जशी राज्य पातळीवर चर्चा झाली तशी चर्चा बेळगाव येथील प्रकरणांची झालीच नाही.
पोलीस भरती परीक्षा देण्यासाठी बेळगावसह राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पोहोचलेल्या बेळगाव जिल्हय़ातील परीक्षार्थींची धरपकड झाली आहे. बेळगाव, बेंगळूर, मंगळूरसह वेगवेगळय़ा परीक्षा केंद्रांवर बेळगाव खासकरून गोकाक तालुक्मयातील तरुण कॉपी करताना अद्ययावत यंत्रणांसह सापडले आहेत. या प्रकरणांचे मूळ शोधण्याचे प्रयत्न झाले असते तर कदाचित पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेतील घोटाळा टाळता आला असता.
अद्ययावत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून परीक्षार्थींना कॉपी
24 ऑक्टोबर 2021 रोजी विविध जिल्हय़ात नागरी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेत अद्ययावत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून परीक्षार्थींना कॉपी पुरविण्यात येत होती. ऑटोनगर येथील टाटा पॉवरप्लांटजवळ असलेल्या एका गोदामात बसून परीक्षार्थींना उत्तरे पुरविली जात होती. सरदार्स पीयु कॉलेजमध्ये परीक्षा लिहिणारा लक्ष्मण हसीरोट्टी, वनिता विद्यालयात परीक्षा लिहिणारी सरस्वती पुजारी यांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व मायक्रो चीप देऊन उत्तरे पुरविली जात होती.
माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात हे रॅकेट चालत होते. प्रत्यक्षात जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या सूचनेवरून जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक वीरेश दोडमनी, उपनिरीक्षक संगमेश होसमनी व डीसीआयबीच्या अधिकाऱयांनी छापा टाकला होता. या कारवाईत 33 मोबाईल संच, 9 मास्टरकार्ड डिव्हाईस, 19 ब्लू डिव्हाईस, 3 टॅब, 1 लॅपटॉप, 1 प्रिंटर, 1 कार, 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या.
लक्ष्मण हसीरोट्टी हा तरुण मसगुप्पी, ता. गोकाकचा. कानात इलेक्ट्रॉनिक डिक्हाईस घेऊन तो पेपर लिहित होता. सरस्वती पुजारी ही तरुणी मुडलगी तालुक्मयातील तिगडीची. आजवर पोलीस भरती परीक्षेत कॉपी करताना रंगेहाथ सापडलेल्यांपैकी अधिकाधिक जण एका गोकाक व मुडलगी तालुक्मयातील आहेत. गोकाकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेत गोलमाल करणारे मोठे रॅकेटच कार्यरत आहे. सीआयडीने गांभीर्याने दखल घेत या रॅकेटच्या मूळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही, असेच आजवरच्या तपासावरून दिसून येते.
गुलबर्गा येथील दिव्या हागरगी या किंगपिंग महिलेला सीआयडीने पुण्यात अटक केली आहे. तिच्या शिक्षण संस्थेतच पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या लेखी परीक्षा झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मार्केट पोलीस स्थानकात एक एफआयआर दाखल झाला. जानेवारी 2020 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेत कॉपी केल्याचा ठपका ठेवत अथणी तालुक्मयातील एका परीक्षार्थीवर एफआयआर दाखल करण्यात आला. परीक्षेनंतर सात ते आठ महिन्यांनी एफआयआर दाखल झाला. सबळ पुराव्याअभावी या प्रकरणी पोलिसांना आरोपपत्रही दाखल करता आले नाही. तरीही अनेक अधिकाऱयांनी या प्रकरणात आपला खिसा गरम करून घेतला आहे.
याच मार्केट पोलीस स्थानकात आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे. शारीरिक चाचणीच्यावेळी उंची वाढविण्यासाठी एका तरुणाने आपल्या डोक्मयावर विग परिधान केला होता. विगच्या खाली थर्मोकॉल घातला होता. त्या तरुणावर एफआयआर दाखल करण्यात आला. 2020 पासून आतापर्यंत बेळगाव जिल्हय़ात पोलीस भरती परीक्षेतील गैरप्रकारांचे आठहून अधिक गुन्हे घडले आहेत.
18 ऑक्टोबर 2020 रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात कृष्णा रामचंद्र ऐहोळे, रोहन शंकर जोडट्टी, (दोघेही राहणार मल्लापूर पी. जी., ता. गोकाक) या दोघा जणांवर एफआयआर दाखल झाला. पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत रोहनच्या बदल्यात कृष्णा ऐहोळे परीक्षेला आला होता. या दोघांनाही अटक झाली. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2020 रोजी मुत्तूराज शिरोशी, रा. गिरीसागर-यादवाड याच्या बदल्यात सुरेश लक्ष्मण कुडची, रा. बेनचिनमर्डी, ता. गोकाक हा परीक्षेसाठी आला होता. या दोघा जणांना अटक झाली होती. त्यांच्यावरही टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
22 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य राखीव दल व आयआरबीसाठी झालेल्या परीक्षेत सचिन दुंडाप्पा कलादगी, रा. बिरनगड्डी, ता. गोकाक याच्या बदल्यात आनंद हणमंत वडेयर हा परीक्षा लिहिण्यासाठी आला होता. शहापूर येथील चिंतामणराव पदवीपूर्व महाविद्यालयात ही परीक्षा झाली होती. गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर या दोघांना अटक झाली होती. शहापूर पोलीस स्थानकात त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. 22 नोव्हेंबरला शिवानंद शंकर गोकाक, रा. मड्डय़ागोळ गल्ली, गोकाक याच्या बदल्यात भीमाप्पा महादेव हुल्लोळी, रा. हडगीनहाळ, ता. गोकाक हा परीक्षा लिहिण्यासाठी आला होता. त्यालाही अटक झाली. 18 ऑक्टोबर 2020 रोजी राजापूर, ता. मुडलगी येथील मंजु निंगाप्पा कट्टीकर हा तरुण भलत्याच परीक्षार्थीच्या नावाने परीक्षा लिहिण्यासाठी आला होता. त्याच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
बेळगाव जिल्हय़ात परीक्षेत अनेक गैरप्रकार
24 ऑक्टोबर 2021 रोजी सरस्वती अर्जुन पुजारी, रा. तिगडी, ता. मुडलगी या तरुणीला मास्टरकार्ड व ब्लूटूथच्या माध्यमातून कॉपी करताना अटक झाली. त्याच दिवशी लक्ष्मण हसीरोट्टी यालाही अटक झाली. या दोघा जणांना कॉपी पुरवणाऱया बारा जणांना जिल्हा पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळय़ापेक्षा आधी बेळगाव जिल्हय़ात परीक्षेतील अनेक गैरप्रकार घडले आहेत. या प्रकारांची गंभीर दखल घेतली गेली नाही. सध्या मास्टरकार्ड व ब्लूटूथच्या माध्यमातून झालेल्या कॉपीचा प्रकार ठळक चर्चेत आहे. अशी कॉपी बेळगाव जिल्हय़ात गेल्या वषीच झाली आहे. या बहुतेक गैरप्रकारांचे केंद्र गोकाक तालुक्मयात असून त्याची पाळेमुळे खणण्याचे काम सीआयडीने हाती घेतले नाही.