गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला भीषण आग, करोडोंचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही
गोकुळ शिरगाव वार्ताहर
,गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या शेरा फ्लक्स थर्मो केम प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत असणऱ्या थर्मो रेगझिन या केमिकल उत्पादनाला काल दुपारी दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतरही आग रात्री सात वाजेपर्यंत दुमसत होती. या आगीमध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे तीन अग्निशामक बंब, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे अग्निशामन , कागल नगर परिषद बंब, शाहू साखर कारखान्याचा बंब जवाहर साखर कारखान्याचा अग्निशामक बंब गोकुळ दूध संघातील टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात आला. याशिवाय कोल्हापूर विमानतळावरील अत्याधुनिक रोजन बियर फायर फायटर अशा १४ हून अधिक अग्निशमन बंबांनी अनेक फेऱ्या मारत पाच तासाहून अधिक काळ शर्तीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.
आमदार ऋतुराज पाटील यांची घटनास्थळी भेट
आगीची माहिती मिळतातच कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कार्याची पाहणी केली. तसेच आगीचे कारण व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची विचारपूस करीत संबंधित कंपनीचे अधिकारी, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांच्याशी संवाद साधत शर्तीचे प्रयत्न करणाऱ्या सर्व यंत्रणांचे कौतुक करीत मनोधैर्य वाढवले. शिवाय गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये लवकरच अग्निशमन यंत्रणा उभा करण्यासाठी तातडीचे प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी गोशिमा व्हाईस चेअरमन स्वरूप कदम यांना दिले.
बफेलो फायर फायटरचा जलवा
घटनास्थळावर तात्काळ पोहोचलेल्या कोल्हापूर विमानतळावरील ऑस्ट्रिया (युरोप) बनावटीच्या रोजन बार बफेलो फायर फायटरने ए ट्रिपल एफ या आधुनिक तंत्राने फोमचा प्रचंड मारा करीत आग आटोक्यात आणण्यासाठी उल्लेखनीय काम केले. दरम्यान, पाण्याचा मारा केल्यानंतर सदर आग जास्तच भडकत असल्याचे लक्षात आल्यानंतर रोजन बार फोनचा प्रचंड मारा करीत यांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेची परिसरात जोरदार चर्चा सुरू होती.अत्यंत ज्वालाग्रही असलेल्या या केमिकल ला लागलेली आग आटोक्यात आणणे अग्निशमन जवानांना मोठे आव्हान होते. कारण पाणी व फोमचा मारा करूनही सायंकाळी सात वाजेपर्यंत आग जास्तच भडकत होती अखेरीस एका कोपऱ्यातील आग विझवण्यासाठी वाळू मागवण्यात आली. व वाळूचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.