3000 मी स्टीपलचेस व गोळाफेकमध्ये सुवर्णमय कामगिरी : 50 मी ट्रॅप प्रकारात पुरुष संघालाही गोल्ड
आठव्या दिवशी तब्बल तीन सुवर्णासह सात रौप्य व पाच कांस्यपदकाची कमाई
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना तीन सुवर्णपदकासह चार रौप्य व तीन कांस्यपदकाची कमाई केली. अॅथलेटिक्समध्ये 3000 मी स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेने तर गोळाफेकमध्ये तेजिंदरपालसिंग तूरने सुवर्णपदकाला गवसणी घातली. याशिवाय, नेमबाजीत 50 मी ट्रॅप प्रकारात पुरुष संघाने सुवर्ण तर महिला संघाने रौप्यपदक जिंकले. तसेच गोल्फमध्ये आदिती अशोकने शानदार कामगिरी करताना ऐतिहासिक रौप्यपदक मिळवले. यासह पदकतालिकेत आता भारताने 13 सुवर्ण, 21 रौप्य व 19 कांस्यपदकासह एकूण 53 पदके जिंकली आहेत.
रविवारी भारताचा स्टार अॅथलीट अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, 1951 साली आशियाई स्पर्धा सुरु झाल्यानंतर प्रथमच भारताला 3000 मी स्टीपलचेस प्रकारात सुवर्ण मिळाले आहे. अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत 8:19:50 सेकंद वेळेसह प्रथम स्थान मिळविले. अविनाशने सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांमध्ये मोठं अंतर ठेवलं होतं. हे अंतर शेवटच्या 50 मीटरपर्यंत कायम राहिले. अविनाशने अखेरच्या क्षणी मागे वळून पाहिलं. अविनाशने आपल्या मागे कुणीच नसल्याचे पाहून विनिंग लाईन क्रॉस करताना एकच जल्लोष केला. या कामगिरीसह त्याने नवा आशियाई विक्रम रचला. त्याने 2018 मध्ये इराणच्या हुसेनने (8:22:79) नोंदवलेला विक्रम मोडित काढला. या प्रकारात जपानने रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. दरम्यान, अविनाश साबळे महाराष्ट्रातील मूळचा बीडचा आहे. 12 वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अविनाश भारतीय लष्कराच्या 5 महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला होता. आता, तो 5000 मी शर्यतीत देखील सहभागी होणार आहे.
गोळफेकमध्ये तेजिंदरपालला सुवर्णपदक
आशियाई क्रीडा स्पर्धेतील गोळाफेक प्रकारात भारताच्या तेजिंदरपाल सिंग तूरने सुवर्णपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, एशियन गेम्समधील त्याचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. तेजिंदरने 20.36 मीटर गोळा फेकत सुवर्णपदक पटकावले. पहिल्या दोन प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर तेजिंदरपालने तिसऱ्या प्रयत्नात 19.51 मीटरचा थ्रो केला. त्याचा चौथा थ्रो 20.06 मीटरचा होता, पण पाचवा थ्रो पुन्हा फाऊल झाला. शेवटच्या थ्रोवर त्याचा सर्वोत्तम प्रयत्न 20.36 मीटर होता, ज्याने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले. तूरने 2018 जकार्ता गेम्समध्ये 20.75 मीटर फेक करुन सुवर्णपदक जिंकले होते. सौदी अरेबियाच्या मोहम्मद डोडा टोलोने 20.18 मीटरसह रौप्यपदक जिंकले, तर चीनच्या लिऊ यांगने 19.97 मीटरसह कांस्यपदकाला गवसणी घातली.
नेमबाजीत एका सुवर्णासह रौप्य व कांस्यपदक
एशियन गेम्समध्ये आठव्या दिवशी देखील शुटिंग टिमने पदकांचा धडाका कायम ठेवला. रविवारी सकाळच्या सत्रात के चेनाई, पृथ्वीराज आणि झोरावर सिंह या त्रिकुटाने पुरुषांच्या सांघिक ट्रॅप नेमबाजीत चमकदार कामगिरी केली. भारतीय नेमबाजांनी 361 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील ट्रॅप शूटिंगमध्ये संघाची ही सर्वोच्च गुणसंख्या आहे. कुवेतच्या संघाने 351 गुणासह रौप्य तर चीनने 345 गुणासह कांस्यपदक जिंकले.
तसेच महिला ट्रॅप संघाने रौप्यपदकाला गवसणी घातली. मनीषा कीर, राजेश्वरी कुमारी आणि प्रीती राजक यांनी 337 गुणांची कमाई करत रौप्यपदक जिंकले. चीनच्या संघाने विश्वविक्रमासह 355 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. कझाकस्तानने 335 गुणासह कांस्यपदक मिळवले.
याशिवाय, वैयक्तिक 50 मीटर ट्रॅप शुटिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. पुरुष सांघिक ट्रॅप शुटिंग स्पर्धेत भारताच्या संघाने सकाळी विक्रमी कामगिरीसह सुवर्ण पदक जिंकले होते. त्या संघात कयनन चेनाईचा देखील समावेश होता. यानंतर त्याने वैयक्तिक ट्रॅप शुटिंग प्रकारात कांस्यपदक जिंकून एका दिवसात दुसरे पदक आपल्या खिशात टाकले. दरम्यान, अंतिम फेरीत भारताचे कयनन आणि झोरावर सिंग संधू यांनी स्थान पटकावले होते. मात्र झोरावर सिंग सहाव्या फेरीनंतर पदकाच्या रेसमधून बाहेर पडला. यानंतर आठव्या फेरीत कयनने 40 पैकी 32 शॉट्स ऑन टार्गेट मारत कांस्यपदक निश्चित केले. चीनच्या यिंगने 50 पैकी 46 शॉट्स ऑन टार्गेट मारत सुवर्णपदकाची कमाई केली. तर कुवैतच्या राशिदी अल तलालने 50 पैकी 45 शॉट्स ऑन टार्गेट मारत रौप्यपदक पटकावले.
आदिती अशोक गोल्फमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
भारताची स्टार गोल्फपटू अदिती अशोकने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. रविवारी तिने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पदक मिळवणारी ती पहिली महिला गोल्फपटू ठरली आहे. अंतिम सामन्यापर्यंत सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या आदितीला थायलंडच्या युबोल अर्पिचायाकडून पराभव पत्करावा लागला. युबोलने अदितीला हरवत गोल्ड मेडल जिंकले. दक्षिण कोरियाच्या ह्युंजो यू हिला कांस्यपदक मिळाले.
भारताला 1500 मी शर्यतीत दोन रौप्य व एक कांस्य
रविवारी अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी साकारली. 1500 मी शर्यतीत पुरुष व महिला गटात भारताला दोन रौप्य व एक कांस्यपदक मिळाले. सुरुवातील महिलांच्या 1500 मी शर्यतीत हरमिलनने 4:12:74 सेकंद वेळ नोदवत रौप्य जिंकले. तर बहरीनच्या युवीने 4:11:74 सेकंदासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. कतारने कांस्यपदक मिळवले.
महिला गटात रौप्यपदक मिळाल्यानंतर भारतीय पुरुषांनीही 1500 मी प्रकारात अजय कुमार सरोज व जिन्सन जॉन्सन यांनी रौप्य व कांस्यपदक जिंकले. एकवेळ अजय कुमार सुवर्णपदकाच्या शर्यतीत होता पण अखेरच्या क्षणी तो मागे पडल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 3:38:94 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली तर जॉन्सनने 3:39:74 सेकंदासह कांस्यपदक जिंकले. कतारच्या अल्गर्नीने या प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
बॉक्सिंगमध्ये निखत झरीनला कांस्य
बॉक्सिंगमध्ये निखत जरीनला महिलांच्या 50 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ती थायलंडच्या बॉक्सरविरुद्ध 2-3 अशा फरकाने हरली. यामुळे आता निखतला केवळ कांस्यपदकावरच समाधान मानावे लागणार आहे. नीखतकडून सुवर्णपदकाची अपेक्षा व्यक्त केली जात होती पण तिला समाधानकारक कामगिरी करता आली नाही.
मुरली, ज्योती यांना रौप्य, सीमा पुनिया, नंदिनी यांना कांस्यपदके
पुरुषांच्या लांबउडीमध्ये भारताच्या मुरली श्रीशंकरने रौप्यपदक पटकावले. त्याने 8.19 मी. लांब उडी घेतली. अन्य एक भारतीय जेस्विन अॅल्ड्रिनला मात्र आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 7.76 मी. लांब उडी घेतली. चीनच्या स्पर्धकानी सुवर्ण व कांस्यपदके मिळविली. वांग जियाननने 8.22 मी. तर शि युहाओने 8.10 मी. उडी घेतली.
महिलांच्या 100 मी. हर्डल्समध्ये भारताच्या ज्योती याराजीने रौप्यपदक मिळविले. तिने 12.91 से. वेळ नोंदवली. आधी तिला कांस्यपदक मिळाले होते. पण चीनच्या खेळाडूला अपात्र ठरविल्यानंतर ज्योतीला रौप्यपदक मिळाले.
महिलांच्या थाळीफेकमध्ये भारताच्या सीमा पुनियाने कांस्यपदक निश्चित केले. तिने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 58.62 मी. थाळीफेक केली.
महिलांच्या हेप्टॅथ्लॉनमध्ये भारताच्या नंदिनी अगासाराने कांस्यपदक मिळविले.
आठव्या दिवशी भारताला मिळालेली पदके
- 3000 मी. स्टीपलचेस – अविनाश साबळे, सुवर्ण
- गोळाफेक – तेजिंदरपाल तूर, सुवर्ण
- पुरुष सांघिक ट्रॅप नेमबाजी – सुवर्ण
- महिला सांघिक ट्रॅप नेमबाजी – रौप्य
- गोल्फ – आदिती अशोक, रौप्य
- 1500 मी शर्यत – अजय कुमार सरोज, रौप्य
- 1500 मी शर्यत – हरमिलन, रौप्य
- लांब उडी – मुरली श्रीशंकर, रौप्य
- पुरुष बॅडमिंटन संघ – रौप्य
- 100 मी अडथळ्यांची शर्यत – ज्योती याराजी, रौप्य
- 50 मी ट्रॅप नेमबाजी – कयानन चेनाई, कांस्य
- बॉक्सिंग – निखत झरीन, कांस्य
- 1500 मी शर्यत – जिन्सन जॉन्सन, कांस्य
- थाळीफेक – सीमा पुनिया, कांस्य
- हेप्टथलॉन – नंदिनी आगरसा, कांस्य.
पुरुष बॅडमिंटन संघाचे ऐतिहासिक रौप्यपदक
एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष बॅडमिंटन टीमने रौप्यपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. रविवारी झालेल्या फायनलमध्ये चीनने भारताला 3-2 अशा फरकाने हरवले. सुरुवातील भारताने 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण, अखेर चीनच्या टीमने बाजी मारली. एकल सामन्यामध्ये लक्ष्य सेनने अंतिम गेममध्ये 8-13 स्कोअर असताना पुन्हा वापसी केली. त्याने फायनलमध्ये चांगली सुरुवात करुन दिली. लक्ष्य सेनने चीनच्या शी वाई याच्या विरुद्ध 22-20, 14-21, 21-18 असा विजय मिळवला. सात्विकसाईराज रंकीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी पहिल्या गेममध्ये 21-15, 21-18 या स्कोअरसह विजय मिळवत आघाडी घेतली होती. पण, यानंतर चीनने सलग तीन सामने जिंकत सुवर्णपदक जिंकले. एकेरीत किदाम्बी श्रीकांत व मिथुन मंजुनाथ तर दुहेरीत ध्रुव कपिला-साई प्रतिक यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने भारताला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले.
विशेष म्हणजे, भारताचे आशियाई स्पर्धेतील हे पहिलेच रौप्यपदक आहे. यापूर्वी भारताने 1974, 1982, 1986 मध्ये कांस्यपदक जिंकले होते. यंदा भारताला सुवर्ण जिंकण्याची नामी संधी होती पण ऐनवेळी प्रणॉयला दुखापत झाली व भारताच्या आशेवर पाणी फिरले.