दुसऱ्या दिवशी दोन सुवर्णासह एकूण सहा पदकांची कमाई : नेमबाजी व रोईंगमध्ये प्रत्येकी दोन कांस्यपदके
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी पाच पदकांची कमाई करणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशीही आपला धडाका कायम ठेवला. सोमवारी भारताने नेमबाजी व महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासह एकूण सहा पदकांची कमाई केली. या शानदार कामगिरीसह पदकतालिकेत भारत दोन सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्यपदकासह एकूण 11 पदकांची कमाई करत सहाव्या स्थानी आहे. दरम्यान, महिला क्रिकेटमध्ये सुवर्ण व नेमबाजीत विक्रमी सुवर्ण पटकावणाऱ्या नेमबाजांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, सचिन तेंडुलकरसह अन्य मान्यवरांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
नेमबाजांची विश्वविक्रमी कामगिरी
सोमवारच्या दिवसाची सुरुवात 10 मी एअर रायफल सांघिक स्पर्धेतील सुवर्णपदकाने झाली. रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंग पनवार, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर या तिघांनी भारताला आशियाई स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. वैयक्तिक पात्रता फेरीत या तिघांनी 1893.7 गुण मिळवले. या कामगिरीने भारतीय संघाने बाकु जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत चीनने (1893.3) रचलेला जागतिक विक्रम मोडीत काढला. रुद्रांक्षने 632.5, ऐश्वर्यने 631.5 आणि दिव्यांश सिंग पनवार याने 629.6 गुण मिळवले.
10 मीटर एअर रायफल्स प्रकारात ऐश्वर्य प्रताप, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश सिंग पनवार यांनी सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली. सुरुवातीला मिळालेली आघाडी त्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या फेरीपर्यंत कायम ठेवली. चौथ्या फेरीत दिव्यांशने 104.7, रुद्रांक्षने 105.5 आणि ऐश्वर्य प्रताप याने 105.7 गुण मिळवले. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या फेरीतही या तिघांनी चमकदार कामगिरी करत जागतिक विक्रमाची नोंद केली. भारतीय संघाने 1893.7 गुणांसह पहिले स्थान मिळवले. त्यानंतर कोरियाचा संघ 1890.1 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. तर 1882.2 गुण मिळवणाऱ्या चीनच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
नेमबाजीत आणखी दोन कांस्य
नेमबाजीत सांघिक प्रकारामध्ये गोल्ड जिंकल्यानंतर भारताने नेमबाजीत आणखी दोन कांस्यपदके जिंकली. ऐश्वर्य प्रताप सिंगने 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. ऐश्वर्य प्रताप सिंगने 228.8 गुणांसह वैयक्तिक कांस्यपदक जिंकले. चीनच्या शेंग लिहाओने 253.3 गुणांसह जागतिक विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले, तर दक्षिण कोरियाच्या हाजुन पार्कने 251.3 गुणांसह रौप्यपदक पटकावले.
ऐश्वर्य प्रताप सिंगनंतर नेमबाजीत अनिश भानवाल, विजयवीर सिद्धू आणि आदर्श सिंग या त्रिकुटाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली. या प्रकारात चीनने विक्रमी 1765 गुणासह सुवर्ण तर द.कोरियाने 1734 गुणांसह रौप्यपदक जिंकले.
रोईंगमध्ये दोन कांस्यपदके
सोमवारी भारताला रोईंगमध्ये आणखी दोन पदके मिळाली. जसविंदर सिंग, आशिष, पुनीत कुमार आणि भीम सिंग यांनी रोईंगच्या पुरुषांच्या कॉक्सलेस फोर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. तर यानंतर रोईंगमध्येच भारताने पुरुषांच्या क्वाड्रपल स्कल्सच्या अंतिम फेरीत परमिंदर सिंग, सतनाम सिंग, जाकर खान आणि सुखमीत सिंग यांनी 06:8:61 सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत चीनने सुवर्णपदक तर उझबेकिस्तानने रौप्यपदक जिंकले. दरम्यान, रोईंगमध्ये एकेरीत भारताच्या बलराज पनवरला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या प्रकारात बलराजकडून भारताला पदकाच्या आशा होत्या पण शेवटच्या क्षणी तो पिछाडीवर पडल्याने भारताला पदकापासून वंचित रहावे लागले. चीनने या प्रकारात सुवर्ण जिंकले. दुसरीकडे भारतीय महिलांनी सांघिक प्रकारात निराशा केली. त्यांनाही चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यासह आशियाई स्पर्धेतील रोईंग क्रीडाप्रकारातील खेळ सोमवारी संपले. यामध्ये भारताने 2 रौप्य व 3 कांस्यपदकाची कमाई केली.
वुशूमध्ये भारताचे पदक पक्के
एकीकडे भारताच्या तीन वुशू खेळाडूंना चीनने व्हिसा नाकारला असताना दुसरीकडे महिला वुशू खेळाडू रोशिबिना देवीने 60 किलो गटात उपांत्य फेरी गाठली आहे. सोमवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात तिने कझाकस्तानच्या एमानला पराभूत केले. या लढतीत रोशिबिनाने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी एमानला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. रोशिबिनाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशासह या क्रीडाप्रकारात भारताचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.
आतापर्यंत भारताने पटकावली 11 पदके
- 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग) – रौप्य
- पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोईंग) – रौप्य
- पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोईंग) – कांस्य
- पुरुष कॉक्सड 8 संघ (रोईंग)- रौप्य
- महिला 10 मीटर एअर रायफल (शूटिंग) – कांस्य
- ऐश्वर्य तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार, 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग)- सुवर्ण
- महिला क्रिकेट – भारतीय महिला संघाला सुवर्णपदक
- आशिष, भीम सिंग, जसविंदर सिंग आणि पुनीत कुमार – पुरुष कॉक्सलेस 4 (रोईंग)- कांस्य
- परमिंदर सिंग, सतनाम सिंग, जाकर खान आणि सुखमीत सिंग पुरुष क्वाड्रपल स्कल्स (रोइंग) – कांस्य
- ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर पुरुष 10 मीटर एअर रायफल (शूटिंग) – कांस्य
- अनिश, विजयवीर सिद्धू आणि आदर्श सिंग, पुरुष 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल (शूटिंग) ा कांस्य