वृत्तसंस्था/ टेरन (पोलंड)
येथे आयोजिलेल्या वयस्करांच्या विश्व मास्टर्स इनडोअर अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हरियाणाच्या महिला अॅथलीट 95 वर्षीय भगवानी देवी डागर यांनी महिलांच्या थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.
फिनलँडमध्ये 2022 साली झालेल्या विश्व मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप वयस्करांच्या स्पर्धेत भगवानी देवी डागर यांनी महिलांच्या 90 ते 94 वयोगटातील 100 मी. धावण्याच्या शर्यतीत जलद धावताना सुवर्णपदक मिळविले होते. भगवानी देवी यांनी पोलंडमधील स्पर्धेतही थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविण्याची आपली परंपरा कायम राखली.
95 वर्षीय भगवानी देवी डागर यांचा जन्म हरियाणातील खडका या ग्रामीण भागात झाला. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. दरम्यान, त्यांच्या 30 व्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. भगवानी देवी यांनी यानंतर दुसरा विवाह केला नाही. दरम्यान, त्यांनी आपल्या तीन मुलांचे संगोपन केले. भगवानी देवी यांच्या 8 वर्षीय मुलीचे अकाली निधन झाल्याने त्यांच्यावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, परिस्थितीला कठोरपणे तोंड दिले. त्यानंतर त्यांच्या आणखी एका मुलीचे निधन झाले. भगवानी देवी यांचा एकमेव मुलगा दिल्लीच्या महानगरपालिकेत लेखनिक पदावर रुजू झाल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली. भगवानी देवी या तीन नातवांच्या आजी आहेत. त्यांचा मोठा नातू विकास डागर हा क्रीडा क्षेत्रात सातत्याने वावरत असून त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. विकास डागर हा अपंग अॅथलीट असून त्याने खेलरत्न पुरस्कारही मिळविला आहे.