वृत्तसंस्था/ बिश्केक, किर्गीजस्तान
येथे सुरू असलेल्या यूडब्ल्यूडब्ल्यू मानांकन कुस्ती मालिकेतील स्पर्धेत भारतीय महिलांनी एका सुवर्णासह तीन पदके पटकावली. महिलांच्या 65 किलो वजन गटात मनीषाला सुवर्ण तर रितीकाला रौप्य व सरिता मोरला कांस्यपदक मिळाले.
भारताची एकूण चार पदके झाली असून याआधी मनजीतने 55 किलो ग्रीको रोमन प्रकारात कांस्य मिळविले होते. मनीषाने आपल्या गटात कझाकच्या इरिना काझयुलिनावर 15-4 अशी मात करून सुरुवात केली. तिने चार लढतीत अपराजित राहत सुवर्ण पटकावले तर काझयुलिनाला रौप्य मिळाले. 72 किलो वजन गटात फक्त तीन स्पर्धक होत्या. रीतिकाने इटलीच्या दालमा कनेव्हावर 7-0 असा विजय मिळविला. पण नंतर कझाकच्या झामिला बाकबरजेनोव्हाकडून तिला 0-4 असा पराभव स्वीकारावा लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 59 किलो वजन गटात सरिता मोरने कझाकच्या डायना कयुमोव्हावर 11-0 अशी एकतर्फी मात करीत कांस्यपदक मिळविले. उपांत्य फेरीत तिला युक्रेनच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला होता.