बेळगाव : फुलबाग गल्ली येथील तालुका रुरल इंडस्ट्रीयल को-ऑप. सोसायटीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता मराठा मंदिर येथे सोसायटीचा सुवर्णमहोत्सवी सोहळा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती चेअरमन रमेश मोदगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या सोहळ्याला महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील, महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पणन संचालक व अतिरिक्त आयुक्त दिनेश ओऊळकर, सहकारी संघाचे संयुक्त निबंधक जी. एम. पाटील, उपनिबंधक एम. एन. मणी, साहाय्यक निबंधक रविंद्र पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून गडहिंग्लजचे प्रा. डॉ. दत्ता पाटील व प्रा. आनंद मेणसे उपस्थित राहणार आहेत.
या सोसायटीची स्थापना 1970 साली झाली. सोसायटीच्या स्थापनेसाठी तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण आजगावकर, माजी आमदार कै. बापुसाहेब महागावकर, मराठा बँकेचे संचालक कै. रामचंद्रराव ताशिलदार यांनी पुढाकार घेतला व भागभांडवल जमा करून सोसायटी स्थापन केली. सोसायटीचा विस्तार झाला तसा फुलबाग गल्ली येथे सोसायटीने स्वत:ची भव्य इमारत उभारली व तेथे कार्यालय सुरू केले. आता उद्यमबाग व ऑटोनगर येथे दोन शाखा सुरू आहेत. सध्या सोसायटीची सभासद संख्या 2828 व भागभांडवल 1 कोटी 68 लाख 32 हजार आहे. सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपत लातूर येथील भूकंपग्रस्तांना, घटप्रभा येथील आरोग्य धाम, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, वरेरकर नाट्या संघ, मराठा समाज सुधारणा मंडळ व अन्य संस्थांना मदत केली आहे. सभासदांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्यावरील गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रियेसाठी सोसायटी अर्थसाहाय्य करते, सभासदांना चष्मा घेण्यासाठी अर्थसाहाय्य करते, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी व्हा. चेअरमन रघुनाथ पाटील व संचालक उपस्थित होते.