पालकांतून नाराजी : सरकार आत्मपरीक्षण करणार का?, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते टॅबचे वितरण
बेळगाव : नववीची परीक्षा झाली. तर दहावीच्या परीक्षेला केवळ चारच दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी बांधकाम कामगारांच्या मुलांना टॅबचे वितरण करण्यात आले. यामुळे सरकारने योजना राबवूनही ती योजना कुचकामी ठरली आहे. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते या टॅबचे वितरण करण्यात आले आहे. सरकारी काम आणि बारा महिने थांब, अशी म्हणच आहे. तसाच प्रकार बांधकाम कामगारांच्या मुलांच्या बाबतीत घडला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना टॅब वितरणाची योजना लागू करण्यात आली. मात्र ती योजना लागू करताना कोणतेच नियम पाळले गेले नाहीत. शैक्षणिक वर्षाला सुऊवात झाल्यानंतर त्याचे वितरण करणे महत्त्वाचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगार अधिकाऱ्यांवर गेल्या काही वर्षांपासून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. ज्या योजना माहिती नव्हत्या त्या योजना माहिती करून देण्यात आल्या. मात्र त्यानंतर त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. 200 विद्यार्थ्यांना वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले. तेही परीक्षेच्या तोंडावर. सोमवारी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी टॅब घेण्यासाठी उपस्थित होत्या. त्यांचे शैक्षणिक नुकसानही झाले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून विद्यार्थी उपस्थित होते. त्यांना वितरण करण्यासाठीही बराच उशीर लावण्यात आला. अॅड. एन. आर. लातूर यांनी अनेकवेळा यासाठी मोर्चा काढून निवेदन दिले. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे परीक्षा दोन दिवसांवर येवून ठेपली असतानाच हे टॅब देण्यात आले आहेत. यामुळे पालकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.