वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गौंडवाड येथील द. म. शि. मंडळ संचलित महात्मा गांधी हायस्कूल गौंडवाड शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे शाळा सुधारणा अध्यक्ष एन. वाय. पिंगट होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. प्रास्ताविकमध्ये शाळेचे मुख्याध्यापक पी. ओ. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन त्यानंतर विद्यार्थ्यांचे पथसंचलन करण्यात आले.
यावेळी क्रीडा स्पर्धेचे ध्वजपूजन व ध्वजारोहण कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील व उपाध्यक्ष यल्लोजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रा. पं. माजी सदस्या लिला पिंगट यांनी केले. क्रीडा साहित्याचे पूजन ग्रा. पं. सदस्या रेखा सुतार यांनी केले. क्रीडाज्योतीचे स्वागत पुनम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांकडून शपथ विधी घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे औचित साधून कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील व उपाध्यक्ष यल्लोजी पाटील या सत्कारमूर्तींचा शाळेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन ग्रा. पं. सदस्य बाबू दोडमनी यांच्या हस्ते करण्यात आले. तर खो-खो स्पर्धेचे उद्घाटन ग्रा. पं. सदस्या कल्पना पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे व शाळा सुधारणा अध्यक्ष एन. वाय. पिंगट म्हणाले, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनाबरोबर खेळामध्येही प्राविण्य मिळवून जीवनात यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जे. पी. अगसामनी, पी. एम. जाधव, एस. एन. गावडे, कविता गौंडवाडकर, प्रगती पाटील, कर्मचारीवर्ग, विद्यार्थी व विद्यार्थीनींसह शिक्षणप्रेमी उपस्थित होते.