नानाविध चवींच्या स्वयंपाकाने गौराईला केले तृप्त : गौरी उभी करण्याच्या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या पद्धती
बेळगाव : नानाविध चवींचा गोडधोडचा स्वयंपाक करून घराघरातील महिलांनी आपल्या लाडक्या लेकीला म्हणजेच गौरीला तृप्त केले. गौरी जेवणाचा थाट सर्वच घरांमध्ये झाला. फार पूर्वीपासून गौरी जेवणाचा एक वेगळाच सोहळा चालत आला आहे. नानाविध चवीच्या भाज्या, खमंग कोशिंबिरी, पंचपक्वान्ने, विविध प्रकारचे भात, सांडगे, पापड, कुरड्या, आंबोळी अशा अनेकविध पदार्थांचा नैवेद्य गौरीला दाखवून महिलांनी तिला तृप्त केले. गौरी उभी करण्याच्या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कलशावर, खड्याची गौर, उभी गौर, ज्येष्ठा-कनिष्ठा गौर अशा ज्यांच्या ज्या पद्धती आहेत, त्यानुसार गौरी उभ्या करण्यात आल्या. अनेक घरांमधून श्रावणातील ज्येष्ठा आणि भाद्रपदामधील कनिष्ठा या दोघी एकत्र उभ्या करून त्यांच्यासभोवती आरास केली जाते. गौरी उभ्या करण्यासाठी खास मंडपी करून घेतली जाते. त्याच्या आतल्या बाजूला करंजी, चकली, लाडू असे फराळाचे पदार्थ लावण्यासाठी हुकसुद्धा ठेवण्यात आलेले असते. मंडपीवर मांडे अथवा साखरपोळी पसरली जाते. मंडपीच्या आतमध्ये गहू आणि तांदळाच्या राशीवर दोन्ही गौरी उभ्या केल्या गेल्या आणि त्यांच्यासमोर हे सर्व पदार्थ मांडण्यात आले.
गौरीच्या निमित्ताने पूजतात वसे
अनेक घरांमध्ये गौरीच्या निमित्ताने वसे पूजण्यात आले. विड्याच्या व हळदीच्या पानावर चिरमुरे, वाळकाचे खाप, खोबरे असे ठेवून गौरी आणि गणपतीपुढे ते ठेवण्यात आले. तर आसपासच्या महिलांनाही वसे देण्यात आले. काही विशिष्ट समाजामध्ये श्रावणामध्येच हळद आणि चुना यांच्या मिश्रणामध्ये म्हणजेच पिवडीमध्ये दोरे भिजवून ते आणून ज्येष्ठा गौरीच्या पोटात ठेवले जातात. गौरी जेवणाच्या दुसरे दिवशी हे दोरे काढून ते गळ्यात बांधून घेतले जातात.
शुक्रवारी गौराईचे आगमन झाल्यामुळे कोडकौतुक
आजच्या दिवशी केलेला स्वयंपाक हेतूत: अधिक प्रमाणात करून तो दुसऱ्या दिवशीसाठी ठेवला जातो. शनिवारी सकाळी महिला एकेक पदार्थ तयार करून घेऊन कोणा एकटीच्या घरी जमतात आणि गौरीची गीते म्हणत हे दोरे बांधून घेतात. गारवा म्हणून या दिवशी आवर्जून दहीभात केला जातो. शुक्रवार हा देवीचा दिवस आणि याच दिवशी गौराईचे आगमन झाल्यामुळे तिचे कोडकौतुक करताना महिलांचा उत्साह ओसंडून वहात होता.