आज गौरीच्या जेवणाचा थाट : तयारीत महिलावर्ग गर्क : कुमारिकांना ज्येष्ठ महिलांचे मार्गदर्शन
बेळगाव : हळदुल्या सोनपावलांनी घरोघरी गौराईचे गुरुवारी आगमन झाले. गौरी प्रामुख्याने नदीकिनाऱ्यावरून किंवा पाणी जिथे आहे, तेथून आणल्या जातात. शहरात विहिरांवरून गौरी आणण्यात आल्या. प्रामुख्याने कुमारिकांनी गौरी हातात घेतल्या आणि ज्येष्ठ महिलांनी त्यांना मार्गदर्शन केले. विहिरींवर कलश नेऊन त्यामध्ये पाच खडे, पाणी, अक्षता घालून त्यावर तेरड्याची रोपे ठेवून गौरी आणल्या गेल्या. ज्या मार्गावरून गौरी आणावयाच्या आहेत, तेथपासून गौरी प्रतिष्ठापना करण्याच्या जागेपर्यंत हळदीने गौरीची पावले रेखाटण्यात आली होती. बाजारपेठेत आता पावलांचे साचेही मिळत असल्यामुळे त्यांचाही वापर केला गेला. ज्या दिवशी गौरी आणल्या जातात, त्या दिवशी साधा नैवेद्य असतो. प्रत्येकाची गौरी आणण्याची पद्धत वेगळी असली तरी नैवेद्य मात्र सारखा असतो. कुणी कलशामध्ये खडे आणि रोपे ठेवून तर कोणी सुगडावरील गौरी तर कोणी कलशावर श्रीफळ ठेवून गौरीचे प्रतिरुप तयार करतात. गौरी आणल्यानंतर भाकरी-भाजीचा असा साधा नैवेद्य करून, आरती करून घरोघरी भोजनाचा बेत पार पडला. सायंकाळी गौरी पाहण्यासाठी महिलांनी परस्परांच्या घरी जाऊन तिचे दर्शन घेतले. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा मोठा थाट असणार आहे. त्याच्या तयारीमध्ये महिलावर्ग गर्क आहे.