रामलीला मैदानात निदर्शने : देशभरातून दिल्लीत पोहोचले शिक्षक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानात रविवारी पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन झाले आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर शिक्षक अन् शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. नॅशनल मूव्हमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम (एनएमओपीएस)च्या बॅनर अंतर्गत रविवारी पेन्शन शंखनाद महारॅली आयोजित करण्यात आली होती.
काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरातपासून ईशान्येपर्यंतच्या राज्यांमधील लाखो शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी एनपीएस खासगीकरण भारत छोडो, जुनी पेन्शन योजना सुरू करा, एनएमओपीएस जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. विविध राज्यांच्या कर्मचाऱ्यांनी सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे आवाहन केले आहे. यादरम्यान ‘जो ओपीएस बहाल करेगा, वहीं देश पर राज करेगा’ अशा घोषणा असणारे टी-शर्ट कर्मचाऱ्यांनी परिधान केले होते.
पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकते, तर जगात सध्या आर्थिक महाशक्ती म्हणून ओळख निर्माण केलेला भारत स्वत:च्या कर्मचाऱ्यांना पेन्शन का देऊ शकत नाही असे प्रश्नार्थक विधान एनएमओपीएसचे अध्यक्ष विजय कुमार बंधू यांनी केले आहे.
अनेक नेत्यांकडून समर्थन
पेन्शन शंखनाद रॅलीला समर्थन देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सभास्थळी हजेरी लावली. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हु•ा, भाकप (माले) महासचिव दीपंकर भट्टाचार्य, काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित, दिल्लीचे माजी आमदार अन् काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली, माजी प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू, सप आमदार लाल बिहारी यादव, आप खासदार संजय सिंह, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश सिंह टिकैत यांनीही सभेला संबोधित करत जुनी पेन्शन व्यवस्था लागू करण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी पूर्ण देश एकजूट झाला आहे. आता देशाचा शिक्षक अन् कर्मचारी जागा झाला असून तो पेन्शन मिळवूनच राहणार असल्याचे एनएमओपीएसचे महासचिव स्थित प्रज्ञ यांनी म्हटले आहे.