सरकारचा निर्णय : कर्मचाऱ्यांची मंगळवारी सुटीची मागणी
बेळगाव : सरकारने सोमवार दि. 18 रोजी गणेशोत्सवाची सुटी जाहीर केली आहे. मात्र, बेळगावसह परिसरामध्ये मंगळवार दि. 19 रोजी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे गणेशचतुर्थी दिवशी शाळा, महाविद्यालये, बँका तसेच सरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी राज्य सरकारने सुटी जाहीर केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रतिवर्षी गणेशचतुर्थी दिवशी राज्यभर शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुटी दिली जाते. राज्य सरकारकडून वर्षभरात असणारे सण, उत्सव यांच्या सुट्या जाहीर केल्या जातात. परंतु, यावर्षी गणेशोत्सवाची सुटी सोमवार दि. 18 रोजी देण्यात आली आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे.
गणेशोत्सव मंगळवारी असताना सोमवारी सरकारने सुटी का जाहीर केली? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सोमवारी सुटी घेऊन मंगळवारी गणेशचतुर्थी दिवशी कामावर हजर रहावे लागणार असल्याने गणेशाची प्रतिष्ठापना केव्हा करावी? असा प्रश्न सरकारी कर्मचारी विचारत आहेत. बेळगाव परिसरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. सरकारने सुटी जाहीर करण्यापूर्वी गणेशोत्सव केव्हा साजरा होणार? याची माहिती घेणे गरजेचे होते. परंतु, एक दिवस आधीच सुटी असल्याने गणेशोत्सवादिवशी कामावर यावे लागणार आहे. शाळादेखील भरणार असल्याने विद्यार्थ्यांसमोरही पेच निर्माण झाला आहे.
मंगळवारी स्थानिक सुटी जाहीर करा
सोमवारी जरी सरकारने गणेशोत्सवाची सुटी जाहीर केली असली तरी मंगळवारी जिल्हा प्रशासनाने स्थानिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. काही शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे या सुटीबाबत विचारणा केली असून याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सुटीबाबत अद्यापही गोंधळाची स्थिती आहे.
शासकीय सुटीसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण : सोमवारीच राहणार सुटीचा दिवस
गणेशोत्सवाची शासकीय सुटी सोमवारी की मंगळवारी? या संभ्रमावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शनिवारी रात्री पडदा टाकला आहे. सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे सोमवार दि. 18 सप्टेंबर रोजीच सुटी असणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सरकारी अधिकारी, शाळकरी मुले व सर्वसामान्य नागरिक यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. शासकीय सुटी 18 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. मात्र, बेळगावसह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात मंगळवार दि. 19 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे सोमवारीच गणेशोत्सवाची सुटी असून बेंगळूर येथील डीपीएआर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण हा निर्णय जाहीर केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.