एलपीजी अनुदान बंद केल्याने 11,654 कोटी वाचविले ः 2021-22 मध्ये केवळ 242 कोटी परतावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सरकारने हळूहळू एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी बंद केली आहे. अनुदान बंद करून सरकारने कोटय़वधी रुपये तिजोरीत जमा केले आहेत. 2020-21 मध्ये केंद्र सरकारने एलपीजी अनुदान म्हणून 11,896 कोटी रुपये खर्च केले होते, तर 2021-22 मध्ये हा खर्च केवळ 242 कोटींवर आला आहे. एकंदर अनुदान बंद केल्याने सरकारने केवळ एका आर्थिक वर्षात 11,654 कोटी रुपयांची बचत केल्याचे दिसून येत आहे.
2017-18 या आर्थिक वर्षात एलपीजी सबसिडीवर 23,464 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये हे अनुदान 37,209 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यानंतर सरकारने लोकांना सबसिडी सोडण्याचे आवाहन केले आणि या आवाहनावर कोटय़वधी ग्राहकांनी सबसिडी सोडल्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षात सरकारचा खर्च 24,172 कोटींपर्यंत कमी झाला. मात्र, 2020 च्या प्रारंभी देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अर्थव्यवस्थेवर ताण पडल्यानंतर सरकारने एलपीजी ग्राहकांना सबसिडी परतावा देण्याची प्रक्रिया बंद केली होती. साहजिकच 2020-21 मध्ये परतावा रकमेमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त घट झाली आणि अनुदानाचा खर्च 11,896 कोटी रुपयांवर आला. त्यानंतर 2021-22 मध्ये हा खर्च केवळ 242 कोटींवर आल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आली.
सध्या ‘उज्ज्वला’ लाभार्थींनाच सबसिडी
जून 2020 मध्ये सरकारने फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सबसिडी घेणाऱया लोकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सरकारने एका वर्षात 12 रिफिलसाठी उज्ज्वला लाभार्थींसाठी प्रतिसिलिंडर 200 रुपये सबसिडी सुरू केली आहे. सिलिंडरवरील अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
वर्षभरात सिलिंडर 218.50 रुपयांनी महाग
23 जुलै 2021 रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 834.50 रुपये होती. ही किंमत आता 1,053 रुपयांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 218.50 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच यावरील अनुदानही रद्द करण्यात आल्याने सर्वसामान्य एलपीजी ग्राहकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सध्या भारतात सुमारे 30 कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. यामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत 9 कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शनचा समावेश आहे.