कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाचा 59 वा दीक्षांत समारंभ उद्या बुधवार दि. 29 रोजी सकाळी 11.45 वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कानपूर भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) माजी संचालक डॉ. संजय धांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राजमाता जिजाऊ सभागृहात होणाऱ्या दीक्षांत सोहळ्यात प्रत्यक्ष आणि पोस्टाने 66 हजार 457 विद्यार्थ्यांना पदवीप्रमाणपत्र प्रदान केली जाणार आहेत. तसेच यंदा राष्ट्रपती सुवर्णपदकाचे मानकरी महेश बंडगर तर कुलपती सुवर्णपदकाचे मानकरी सोहम जगताप ठरले आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात 16 हजार 594 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तर 49 हजार 863 विद्यार्थ्यांना पोस्टाने एकूण 66 हजार 457 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. पीएच. डी. पदवी 300 स्नातकांपैकी 46 स्नातकांना प्रत्यक्ष प्रदान केली जाईल. तसेच प्रत्येक विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. यंदा 33 हजार 785 मुली तर 32 हजार 672 मुल पदवी घेणार आहेत. त्यामुळे मुलांपेक्षा एक ते दीड टक्का ज्यादा मुलींचे प्रमाण आहे.
दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे कानपूर आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांडे उपस्थित राहतील. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1948 साली झाला. सीओईपी पुणे येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी कानपूर आयआयटीमध्ये पीएच. डी. पदवी घेतली. यूएसएमध्ये संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतले. शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. रॅपिड प्रोटोटाइपिंग, थ्रीडी प्रिंटिंग यासारख्या तंत्रज्ञानाची ओळख त्यांनी करून दिली. सक्षम प्रशासक, सरकारी सल्लागार संस्थांचे अध्यक्ष, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, राष्ट्रीय उत्पादन स्पर्धात्मक परिषद आणि नॅशनल इनोव्हेशन कौन्सिलच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य, सध्या ते सिंगापूर सरकारच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सल्लागार समितीचे सल्लागार आहेत. संगणक तंत्रज्ञानात त्यांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. धांडे दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. अलोक जत्राटकर, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, एनएसएस संचालक डॉ. तानाजी चौगुले, परीक्षा विभागातील उपकुलसचिव आदी उपस्थित होते.
पदवीप्राप्त शाखानिहाय विद्यार्थी
सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी : 27550
कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेंट : 21155
ह्युमॅनिटीज : 15539
इंटर डिसीप्लीनरी स्टुडंट : 2213
एकूण : 66457