गृहलक्ष्मीसाठी वाढीव मानधन देण्याची मागणी
बेळगाव : सरकारी योजना गावागावांत पोहोचविण्यामध्ये व योजनांचा लाभ करून देण्यात महत्त्वाची भूमिका ग्रामवन सेवाकेंद्र बजावत आहेत. सध्या गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज या केंद्रांतूनच केले जात आहेत. मात्र सरकारकडून केवळ 12 रुपये एक अर्जासाठी शुल्क देण्यात येत आहे. हे अत्यल्प असून शुल्क वाढ करून देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामवन सेवाकेंद्राच्या चालकांकडून देण्यात आले. ग्रामवन सेवाकेंद्रातून विविध सेवा दिल्या जात आहेत. सध्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेसाठी या केंद्रांमधूनच अर्ज करण्यात येत आहेत. सरकारकडून एक अर्ज भरण्यासाठी 20 रुपये देण्यात येत आहेत. यामध्ये आठ रुपये जीएसटी कपात होत आहे. केंद्र चालकांना केवळ 12 रुपये हाती येत आहेत. हा अत्यल्प मोबादला आहे. या मोबदल्यातून केंद्र चालविणे अशक्य आहे. केंद्राचे भाडे, वीजबिल, प्रिंटर, कागद खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार असा खर्च भागवावा लागत आहे. त्यामुळे सरकारकडून दिला जाणारा मोबदला अत्यंत कमी आहे. इतक्या कमी मोबदल्यात काम करणे अशक्य आहे. यासाठी सेवाकेंद्र चालकांकडून सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सेवाकेंद्र प्रारंभ करताना घेण्यात आलेले कर्ज भरणेही अशक्य झाले आहे. या केंद्रातून आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक, आधारसेवा, गृहलक्ष्मी, गृहज्योती सेवासिंधू पीकविमा सेवा दिल्या जातात. यासाठी देण्यात येणारे कमिशन वेळेत दिले जात नसल्याने केंद्राच्या चालकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासाठी सरकारने वाढीव मानधन द्यावे, अन्यथा सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. गृहलक्ष्मी योजनेसाठी मोफत अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. सरकारकडून आपल्याला वेतन दिले जाते, अशी समज आहे. त्यामुळे केंद्राच्या चालकांकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून सरकारने याचा गांभीर्याने विचार करून वाढीव मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.