Kolhapur Gram Panchayat Election 2022 : कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. वयोवृध्दापासून नवतरुण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर उत्साह पाहायला मिळाला. महिलांनीही मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी हजेरी लावली. जिल्ह्यात आज नेमके वातावरण कसे होते. कोणत्या तालुक्यात किती मतदान झाले याचा थोडक्यात आढावा घेऊया या छायाचित्रांच्या माध्यमातून…
राधानगरी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी आज सकाळी साडे सातच्या सुमारास मतदानास सुरवात झाली. सकाळी साडे बारापर्यत राधानगरीत ५६ टक्के मतदान पूर्ण झाले. सकाळ पासून पिरळ, सोन्याची शिरोली, कुडूत्री, बनाचीवाडी, पडळी, कारीवडे या गावात सकाळ पासून अत्यंत चुरशीने मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. पिरळ मध्ये मतदान प्रक्रिया सुरू होताच ई.व्ही.एम मशीन एक तास बंद पडल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. पुन्हा या मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसरे मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरू केली.
खोची : भेंडवडे ता.हातकणंगले येथील ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू असून सकाळी साडे अकरा पर्यंत ३६ टक्के मतदान झाले.एकूण पाच प्रभागात १३ सदस्य असून सरपंच पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या ठिकाणी स्नेहल धनाजी निकम व स्नेहल अभिजीत माने या सरपंच पदासाठी आपले भवितव्य आजमावत आहेत. एकूण ३६९६ मतदान असून पैकी १३३६ मतदान साडेअकरा वाजेपर्यंत झाले. मतदारांनी मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी केली आहे. यामध्ये महिला वर्गाची संख्या लक्षणीय आहे.