अंगडी कॉलेज मैदानावर आयोजन, खवय्यांसाठी पर्वणी : 15 जानेवारीपर्यंत अन्नोत्सव
प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित ‘अन्नोत्सव 2023’ चे शुक्रवारी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. सावगाव रोड, नानावाडी येथील अंगडी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर भव्य-दिव्य अन्नोत्सव भरविण्यात आला आहे. 15 जानेवारीपर्यंत अन्नोत्सवातील खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे.
रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या सदस्यांचे कौतुक करत इतका मोठा इव्हेंट भरविल्याबद्दल आनंद व्यक्त केला. खासदार मंगला अंगडी यांनी अन्नोत्सवाला शुभेच्छा दिल्या. अरिहंत हॉस्पिटलचे संचालक डॉ. एम. डी. दीक्षित, उत्तम पाटील, इंड्स अल्टम इंटरनॅशनल स्कूलचे कर्नल शामविजय सिंम्हा, केमिको कंपनीचे वैभव सर्वोजी यांचा सत्कार करण्यात आला.
फीत कापून मान्यवरांनी उद्घाटन केले. अध्यक्ष बसवराज विभूती यांनी स्वागत केले. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. इव्हेंट चेअरमन पराग भंडारे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. योगेश कुलकर्णी यांनी आभार मानले.
यावेळी माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, मनोज हुईलगोळ, सुभाष चांडक, उमेश सरनोबत, आनंद सराफ, नितीन शिरगुरकर, मिलिंद पाटणकर, राजू पोतदार, डॉ. शशिधर शेट्टी, डॉ. विजय देसाई, अनिश मेत्राणी, जीवन खटाव, प्रमोद अगरवाल, सचिन बिच्चू, आनंद देशपांडेसह इतर सदस्य उपस्थित होते.
खमंग पदार्थांची मेजवानी
अन्नोत्सवाला पहिल्या दिवसापासूनच उत्तम प्रतिसाद मिळाला. स्टार्टर्स, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता आला. बेळगावच नाही तर पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, बेंगळूर, तुमकूर येथील विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. 200 हून अधिक खाद्य पदार्थ, गृहोपयोगी वस्तू, कपडे, चप्पल हे एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी जाईंट व्हील व इतर खेळ सुरू असल्याने नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.