वकिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : सर्वसामान्य ग्राहकांना तातडीने न्याय मिळावा यासाठी राज्य ग्राहक न्यायालय पीठाला कायमस्वरुपी मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी यासाठी जागा देण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून चालढकलपणा करण्यात येत आहे. तेव्हा या न्यायालयासाठी त्वरित इमारत द्यावी, अशा मागणीचे निवेदन कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वामध्ये वकिलांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बेळगाव येथे ग्राहक न्यायालय पीठ कायमस्वरुपी स्थापन करण्यासाठी दोन वर्षांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. या न्यायालयासाठी इमारत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. इमारत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला इमारत उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र पाठवून सूचना केली आहे. मात्र यापुढे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे न्यायालयाला इमारत उपलब्ध झालेली नाही. यामुळे ग्राहक न्यायालयातील अर्जदारांना याचा फटका बसत आहे. याची दखल घेऊन त्वरित इमारत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त ग्राहक आयोगाच्या न्यायालयालाही स्वतंत्र कोठडी कर्मचारी तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर मागण्यांची येत्या आठ दिवसात पूर्तता न झाल्यास जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अॅड. एन. आर. लातूर यांनी दिला आहे. यावेळी अॅड. आर. एन. लातूर, अॅड. डी. टी. बस्तवाडे, अॅड. एस. आर. कोलकार, अॅड. एस. एस. देसाई, अॅड. आर. ए. दळवी आदी उपस्थित होते.