आध्यात्मिक कार्यक्रमांद्वारे समाजप्रबोधन : आज होणार सांगता
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे (इस्कॉन) हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी शहर परिसरात हरे कृष्णच्या गजरात रथयात्रा उत्साहात पार पडली. रविवारी इस्कॉन मंदिराच्या मैदानात भजन, कीर्तन, भगवान श्री राधाकृष्णाची आरती आणि लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
सकाळी लोकनाथ स्वामी महाराज व चंद्रमौळी महाराज यांचे प्रवचन झाले. सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत प्रवचनात नागरिकांना जीवनोपयोगी प्रबोधन करण्यात आले. भक्तांच्या उपस्थितीत माधवचरण प्रभू यांच्या हस्ते यज्ञ करण्यात आला. गौरांगप्रसाद प्रभू यांनी पौरोहित्य केले. मदनगोविंद प्रभू व सुदनंदन प्रभू यांनी संयोजन केले. मैदानात विविध प्रदर्शने मांडण्यात आली आहेत. यामध्ये गो-रक्षण, लहान मुलांवरील संस्कार, तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावे, याबाबत नाटिकांद्वारे जागृती केली जात आहे. शाळांच्या विद्यार्थ्यांनी नाटिकांचे सादरीकरण करून तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबरोबरच भगवद्गीता प्रदर्शन, स्लाईड शो, ध्यानधारणा, आध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, भक्तिसाहित्य, मोफत प्रसाद वितरणाचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. सकाळपासून भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मैदान भक्तांनी गजबजू लागले आहे.
नाटिकांतून समाजप्रबोधन
सोमवारी सकाळी प्रवचन आणि लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्याबरोबरच मल्लखांब, कठपुतळी, स्लाईड शो आणि नाटिकांचे सादरीकरण होणार आहे. या नाटिकांतून समाजप्रबोधनाचे काम केले जाणार आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसहा नंतर कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. त्यानंतर प. पू. चैतन्य स्वामी महाराजांचे प्रवचन व सुजय कुलकर्णी, धारवाड यांचे भरतनाट्याम होणार आहे. त्यानंतर चंद्रमौली महाराज आणि गोविंद स्वामी महाराज यांची प्रवचने होतील. दरम्यान, सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा समारोप कालिया दमण या नाट्यालिलेने होईल. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.